Pune Stray Dog Sterilization: पुण्यात भटक्या श्वान नसबंदी प्रकल्पाला खीळ; दोन केंद्रे बंद, निधीअभावी अडथळे

तीन लाख श्वानांच्या नियंत्रणासाठी अपुऱ्या संस्था; अनुदान वाढवण्याची मागणी जोरात
Stray Dogs
Stray DogsPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेतर्फे भटक्या श्वानांची नसबंदी आणि लसीकरणासाठी तीन संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. यापैकी एका संस्थेची दोन केंद्रे बंद असल्याची धक्कादायक माहिती दैनिक ‌‘पुढारी‌’च्या प्रतिनिधींनी केलेल्या पाहणीतून समोर आली आहे. खासगी संस्थेची केंद्रे चालवण्यासाठी निधी अपुरा आहे. सध्याच्या संस्थांची संख्या अपुरी असून, तीन लाख श्वानांची नसबंदी करण्यासाठी आणखी पाच संस्थांची गरज असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेतर्फे युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर सोसायटी, कॅनाईन कंट्रोल अँड केअर (सीसीसी) आणि ब्लू क्रॉस सोसायटी या तीन संस्थांना नसबंदी आणि लसीकरणाचे काम देण्यात आले आहे. या सर्व संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन ‌‘दैनिक पुढारी‌’च्या प्रतिनिधींनी पाहणी केली. ‌‘युनिव्हर्सल‌’ची तिन्ही केंद्रे आणि ‌‘ब्लू क्रॉस‌’चे केंद्र नियमितपणे सुरू आहे. मात्र, अनुदान अपुरे असल्याचे केंद्रे चालवताना ताण येत आहे. सीसीसी‌’ची बाणेर आणि नायडू हॉस्पिटल येथील दोन्ही केंद्रे बंद आहेत. मर्यादित मनुष्यबळ, अपुरी केंद्रे आणि कमी अनुदान यामुळे नसबंदीचे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Stray Dogs
Junnar Ambegaon Prant Adhikari: प्रांताधिकारी कार्यालयात 50 हजारांची लाच घेणाऱ्या लिपिकास अटक, प्रांताधिकारीही ताब्यात

‌‘सीसीसी‌’चे केंद्र 2 वर्षांपासून बंदच

बाणेर येथील मोहननगर जवळ उभारण्यात आलेले बाणेर डॉग पॉन्ड गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याचे लक्षात येत आहे. महापालिकेने या डॉग पॉन्ड वेळेवर देखभाल दुरुस्ती न केल्याने हे सेंटर बंद पडल्याचे लक्षात येत आहे. येथील स्वयंसेवकांनी वारंवार सांगून देखील देखभाल दुरुस्ती न झाल्याने अखेर हे सेंटर 2024 पासून बंद असल्याचे लक्षात येत आहे. सीसीसी ही संस्था बजाजच्या सीएसआर फंडातून येथील व्यवस्थापन पाहत होती. 2021 साली सुरू झालेले हे सेंटर प्रशासनाच्या उदासीनतेमुळे 2024 पर्यंतच चालले. महापालिकेने बांधलेली ही निकृष्ट दर्जाची इमारत गळत असल्याने या ठिकाणी काम करणे अवघड झाले होते. त्याचबरोबर पाण्याची सुविधा, इलेक्ट्रिक करंट बसणे, ड्रेनेज पाणी व सेफ्टी टँक त्यांच्या समस्या उद्भवू लागल्या व काम करणे अवघड झाल्याने अखेर हे सेंटर बंद पडले आहे. पालिकेला वारंवार सांगून देखील या ठिकाणची देखभाल दुरुस्ती झाली नसल्याचे लक्षात येत आहे.

या सेंटरमध्ये जवळपास आम्ही 2500 श्वानांची नसबंदी करून घेतली आहे. बाणेर-बालेवाडी भागात हा डॉग पॉन्ड खूप महत्त्वाचा भाग होता. हा बंद झाल्यापासून येथील श्वान आता वेगवेगळ्या भागांत पाठवावे लागत आहेत. येथील सुविधांच्या अभावामुळे हे सेंटर बंद झाले आहे.

राधिका एकबोटे, स्वयंसेवक

Stray Dogs
Nira Basin Dam: निरा खोऱ्यात धरणे तुडुंब; उन्हाळ्यातही शेतीला पाण्याची चिंता नाही

कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी

वडकी येथील केंद्राला भेट दिली असता काम सुरळीत सुरू होते. मात्र, कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याचे आढळले. ऑपरेशन थिएटरमध्ये दोन श्वानांचे नसबंदी ऑपरेशन सुरू होते. डॉग कॅचर व्हॅन व ॲम्ब्युलन्स समोर उभ्या होत्या. डॉक्टर तिथेच राहत असल्याचे निदर्शनास आले. या केंद्रामध्ये 200 श्वान व 200 मांजरी ठेवण्याची क्षमता असून, सध्या 60 श्वान व 30 मांजरी ठेवण्यात आल्या आहेत. येथे दररोज साधारण 50 श्वानांची शस्त्रक्रिया व रोज सरासरी 100 श्वानांचे लसीकरण होते. रोज तीन गाड्यांद्वारा पुणे महापालिकेच्या हद्दीत फेऱ्या होतात. श्वानांसाठी भात व चिकन, मांजरीसाठी कॅट फिड असे खाद्य देण्यात येते. या केंद्रामध्ये एकूण तीन डॉक्टर, तीन हेल्पर, तीन केअरटेकर, तीन ड्रायव्हर, एक वॉचमन, एक स्वयंपाकी व आठ डॉग कॅचर असे सर्व मिळून 21 कर्मचारी असून सर्वांचे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नियमितपणे लसीकरण करण्यात येते, अशी माहिती केंद्र व्यवस्थापक डॉ. शोभित मिंज यांनी दिली.

Stray Dogs
Shirur Gas Cylinder Shortage: शिरूरमध्ये गॅसटंचाईचा फटका; ग्रामीण भागात सिलिंडर गायब, जेजुरीत हॉटेल व्यवसाय धोक्यात

युनिव्हर्सल केंद्राची क्षमता वाढवण्याची गरज

होळकरवाडी येथील ‌‘युनिव्हर्सल‌’च्या केंद्रामध्ये श्वान निर्बिजीकरण आणि लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. सेंटरमध्ये दोन लसीकरण गाड्या आणि तीन श्वान पकडणाऱ्या गाड्या कार्यरत आहेत. दररोज सुमारे 30 ते 32 भटक्या श्वानांना पकडून त्यांची शारीरिक तपासणी अहवालानुसार शस्त्रक्रिया केली जाते. सेंटरमध्ये तीन अनुभवी डॉक्टर आणि 35 कर्मचारी आहेत. सेंटरमध्ये 450 श्वानांना सांभाळण्याची क्षमता असून, सध्या केंद्रात 110 श्वान आहेत. 15 गुंठ्यांमध्ये असलेल्या या प्रकल्पामध्ये 10 गुंठ्यांत श्वानांची व्यवस्था करण्यात आली असून, त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली जाते. या प्रकल्पासाठी लागणारी सर्व औषधे, श्वानांचे खाद्य आणि तांत्रिक साहित्य महापालिकेकडून पुरवले जात आहे. मात्र, श्वानांची एकंदरीत संख्या पाहता केंद्राची क्षमता वाढवण्याची गरज अधोरेखित होत आहे.

आत्तापर्यंत अनेक श्वानांचे लसीकरण करून त्यांना सोडण्यात आले आहे. काही श्वानांच्या गंभीर आजारावर शस्त्रक्रिया केली जाते. दररोज एका परिसरामध्ये आमच्या वाहनांची गस्त असून, श्वान पकडून आणण्याची प्रक्रिया राबवली जाते. आगामी काळात या सेंटरची क्षमता वाढविण्यात येणार आहे.

आनंद कुमार, युनिव्हर्सल निमल वेलफेअर सोसायटीचे प्रमुख, होळकरवाडी

Stray Dogs
PNG Gas India: पीएनजीला चालना देण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; गॅस पाइपलाइनसाठी नवे नियम लागू

गुजरवाडीतील केंद्राला हवी आर्थिक मदत

केंद्रात दरमहा सुमारे 3,500 भटक्या श्वानांची नसबंदी केली जात असल्याचे समोर आले आहे. मात्र, महापालिकेकडून मिळणारे अनुदान आणि प्रत्यक्षातील जागा भाडे, गाड्यांचा डिझेल खर्च, कर्मचारी पगार, लाईट बिल, औषधे, लसीकरण खर्च यांचा मेळ बसवणे संस्थेसाठी कठीण झाले आहे, यामुळे मोठी ओढाताण होत असल्याचे संस्थाचालक डॉ.स्वाती शेळके, डॉ. हनुमंत शेळके यांनी सांगितले.

गुजरवाडी येथील या केंद्रात दररोज सुमारे 120 भटके श्वान पकडून आणली जातात. केंद्राची क्षमता दररोज 200 श्वानांची नसबंदी करण्याची असून, महिन्याकाठी 6,000 श्वानांवर उपचार करण्याची ताकद या संस्थेकडे आहे. मात्र, सध्या विविध तांत्रिक आणि आर्थिक कारणांमुळे महिन्याला सरासरी साडेतीन हजार श्वानांची नसबंदी केली जाते. श्वान पकडण्यापासून ते त्यांच्या देखभालीपर्यंत एकूण 121 कर्मचाऱ्यांचा ताफा येथे कार्यरत आहे. सध्या संस्थेकडे श्वान पकडण्यासाठी आणि रुग्णवाहिका अशी सर्व मिळून दहा वाहने आहेत.

अनुदान रु. 1 हजार 650 वरून 3 हजार 200 करा!

सध्या पुणे महापालिकेकडून एका श्वानांच्या नसबंदीसाठी संस्थेला 1,650 रुपये अनुदान मिळते. निमल वेल्फेअर बोर्डाच्या नियमानुसार, महापालिकेने जागा, पाणी आणि वीज उपलब्ध करून दिली, तर हे अनुदान योग्य ठरते. परंतु, युनिव्हर्सल संस्था स्वतःची जागा भाड्याने घेऊन, पाण्याचे आणि विजेचे बिल स्वतःच भरत आहे. संस्थेचे चालक डॉ. हनुमंत शेळके आणि डॉ. स्वाती शेळके यांनी ‌‘पुढारी‌’शी बोलताना सांगितले की, जागा भाड्याने घेऊन आणि सर्व खर्च स्वतः करून हे काम करणे आता परवडणारे राहिलेले नाही. महापालिकेने हे दर वाढवून प्रति श्वान 3,200 रुपये करावेत, अशी आमची मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news