

पुणे: वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका करण्यासाठी शहरात 54 किलोमीटर लांबीचे चौपदरी भुयारी मार्ग तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यातील जाहीर सभेत केली. ‘पाताल लोक’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे पुण्यात भुयारी मार्ग तयार करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या संकल्पनेची उत्साही चर्चा आज दिवसभर पुणेकरांमध्ये रंगली होती.
‘केवळ घोषणा करणारे नव्हे, तर काटेकोर आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करणारे द्रष्टे नेतृत्त्व,’ ही मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिमा आहे. मुख्यमंत्र्यांची पाताल लोकची घोषणा पुण्याच्या वाहतुकीचे चित्र बदलून टाकेल, असा आशावाद पुणेकर व्यक्त करत आहेत. महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्र्यांनी कात्रजपासून पहिल्या भुयारी मार्गाचे काम सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले. येरवडा, खडीमशिन चौक, स्वारगेट, रेस कोर्स, जगताप डेअरी, सिंहगड रस्ता, पाषाण, कोथरूड, कात्रज, औंध, संगमवाडी, खडकी हे भाग भुयारी रस्त्याने जोडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्याच्या वाढीकडे लक्ष देऊन दोन दशकांपूर्वीच वाहतूक नियमनाचा आराखडा तयार करण्याची गरज होती. तत्कालीन काँग््रेास-राष्ट्रवादीचे राज्यातील आणि महापालिकेतील सत्ताधारी यात संपूर्ण अपयशी ठरले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रयत्नांची आणि आगामी नियोजनाची चर्चा शहरातल्या नोकरदारांमध्ये आणि विशेषतः तरुणांमध्ये सुरू झाली आहे.
मेट्रोचा विस्तार, उड्डाणपुलांचे बांधकाम, रिंगरोडच्या कामाला गती अशा माध्यमातून भाजपा सरकार गेल्या दहा वर्षांपासून गांभीर्याने प्रयत्न करत असल्याचे पुणेकर पाहात आहेत. आता पुण्याच्या वाहतुकीवरचा समग््रा आराखडा स्वतः मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांसमोर मांडल्याने जलद वाहतुकीचे सुखद स्वप्न पुणेकर पाहू लागले आहेत.
मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 जिल्ह्यांना जोडणारा 701 किमी लांबीचा देशातील सर्वात लांब समृद्धी महामार्ग विक्रमी वेळेत बांधून दाखवला. पुणेकरांसाठी वरदान ठरलेला 22 किमी लांबीचा अटल सेतू हा मुंबईतील सागरी मार्ग मुख्यमंत्र्यांनी विक्रमी वेळेत पूर्ण केला. पुणेकरांना उपयुक्त नवी मुंबई विमानतळ देखील कमी कालावधीत पूर्ण झाले. अनेक मोठे पायाभूत सुविधांचे प्रकल्प जलदगतीने मार्गी लावणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांचा इतिहास बोलेल ते करून दाखवण्याचा आहे. आधुनिक पुण्याची पायाभरणी त्यांच्या नेतृत्त्वात होईल, यावर विश्वास असल्याचे पुण्यातील तरुणाईचे म्हणणे आहे.