

पुणे: गतवर्षीच्या तुलनेत वाहतुकीचा वेग 10 टक्क्यांपेक्षा अधिक वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी शहरातील वाहतुकीचा सरासरी वेग ताशी 19.5 कि.मी. इतका होता. सध्या हा वेग 22.5 कि.मी. इतका झाला असून, यामध्ये 10.44 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. भविष्यात शहरातील वाहतुकीचा सरासरी वेग ताशी 30 कि.मी.पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट शहर पोलिसांनी ठेवले असल्याचे देखील ते म्हणाले.
दुसरीकडे तंत्रज्ञानाची मदत आणि दररोजच्या निरीक्षणातून शहरात 32 ठिकाणे कायमस्वरूपी वाहतूक कोंडीची असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी विशेष उपाययोजना हाती घेतल्या असून, तेथे टप्याटप्प्याने काम केले जाणार आहे. वाहतूक कोंडी ही समस्या दिवसेंदिवस अधिक जटिल होत चालली आहे. ती सोडवण्यासाठी वर्षभरापासून अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
18 लाख 72 हजारांवर कारवाई
वाहतूक पोलिसांनी वर्षभरात 18 लाख 72 हजार 225 बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कारवाईचे प्रमाण सात लाख 68 हजाराने जास्त आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह प्रत्यक्ष कारवाई करण्यास प्राधान्य देण्यात आले असून, आत्तापर्यंत 54 कोटी रुपयांहून जास्त दंड वसूल केला आहे. शहरात विरुद्ध दिशेने वाहने चालविण्याचे प्रमाण मोठे आहे. वर्षभरात विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या 5 लाख 1 हजार 667 वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली.
वाहतुकीचा वेग, कोंडी, प्रवाह याचे विश्लेषण
वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या उपाययोजना, रस्त्यांवरील अडथळे कमी करणे तसेच शहरातील मेट्रोसेवेचा विस्तार यामुळे वाहतुकीच्या वेगात सकारात्मक बदल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शहरातील वाहतुकीच्या प्रत्येक मिनिटाचा आढावा दररोज घेतला जात असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली. यासाठी महापालिकेची एटीएमएस प्रणाली, तसेच गुगल मॅप, मॅपल्स आणि मॅप माय इंडिया या प्रणालींचा वापर केला जातो. शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांवरील वाहतुकीचा वेग, कोंडी आणि प्रवाह याचे सतत विश्लेषण करण्यात येते.
रस्तारुंदीकरणामुळे वहनक्षमतेत वाढ
सिग्नल सिंक्रोनायझेशन, राँग साइड आणि ट्रिपलसीट वाहनचालकांवर कडक कारवाई, बॉटल नेक ठिकाणी सुधारणा, शहरातील ’मिसिंग लिंक’ जोडणे, वाहतुकीचे अडथळे हटवणे, चौक व जंक्शन सुधारणा आदी योजना वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी प्रभावी ठरल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
’लो कॉस्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट’अंतर्गत राबवलेल्या उपाययोजना
23 ठिकाणी ’राइट टर्न’ बंद.
सात रस्त्यांवर एकेरी वाहतूक.
101 सिग्नलचे सिंक्रोनायझेशन.
19 पीएमपी बसथांब्याचे स्थलांतर.
पाच खासगी प्रवासी बसथांबे हलविले.
रस्त्यांवरील 9 आयलँड हटवले.
दोन ठिकाणी मिसिंग लिंकजोडणी.
सहा बॉटल नेक रस्त्यांचे रुंदीकरण.
30 चौक-जंक्शनची दुरुस्ती.