Pune Crime Statistics: पुणे शहरातील गुन्हेगारीचा वार्षिक आढावा; खून, ड्रग्ज, टोळ्यांवर मोठी कारवाई

2025 मध्ये गंभीर गुन्ह्यांत घट; शिक्षेचे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत नेण्याचे पोलिसांचे उद्दिष्ट
Pune Crime Statistics
Pune Crime StatisticsPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरात गेल्या वर्षभरात 79 खून, तर 153 खुनाचे प्रयत्न आणि 1 हजार 453 गंभीर दुखापतीच्या घटना घडल्या आहेत. 2024 च्या तुलनेत या गुन्ह्यांमध्ये 14 ते 15 टक्क्याने घट झाली असली तरी, दहशतीचे सावट मात्र कायम असल्याचे दिसून येते. पुणे पोलिस आयुक्तालयातर्फे आयोजित वार्षिक गुन्हे आढावा या पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली. या वेळी सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारीदेखील उपस्थित होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, पोर्शे कार अपघात प्रकरणात सुरुवातीला पुणे पोलिसांवर समाजातून टीका झाली होती. मात्र, पोलिस दलाने कार्यक्षमतेने तपास करत पीडितांना न्याय मिळवून दिला. आज 19 महिन्यांनंतरही आरोपींना जामीन मिळालेला नाही. सर्वसामान्य नागरिकांना न्याय म्हणजे काय, हे आम्ही कृतीतून दाखवून दिले.

Pune Crime Statistics
Maharashtra Road Accident: डुंबरवाडी येथे भीषण अपघात; मजुरांच्या पिकअपला दुधाच्या टँकरची धडक

आरोपींच्या आवळल्या आर्थिक नाड्या

टोळीयुद्धाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, वर्षभरात काही टोळीप्रमुखांकडून गंभीर स्वरूपाच्या घटना घडल्या. मात्र, पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्या आर्थिक स्रोतांवर घाव घातला, मालमत्ता जप्त केली आणि बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर अग्निशस्त्र जप्त केले असून, शस्त्र खरेदीचे स्रोत शोधून काढण्यात आले आहेत. उमरटी येथे झालेल्या कारवाईचे दीर्घकालीन परिणाम दिसून येतील.

कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त

आगामी काळात आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हेगारांवर विशेष मोहीम राबवून घरझडतीही घेतली जाणार आहे. अमली पदार्थांविरुद्ध वर्षभरात मोठ्या प्रमाणावर कारवाया करत कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त केले.

Pune Crime Statistics
Pune Election 2026: उमेदवारीच्या अखेरच्या दिवशी ट्विस्ट! भाजपचा प्रभाग ३ मध्ये मास्टरस्ट्रोक; उच्चशिक्षित ऐश्वर्या पठारे रिंगणात

सोनसाखळी चोरांचा कहर कायम

गंभीर गुन्ह्यांत घट होत असताना सोनसाखळी चोरीचे प्रकार मात्र वाढले आहेत. मागील तीन वर्षांच्या तुलनेत या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली असून, उपनगरांमध्ये या घटना अधिक घडत आहेत. सोनसाखळी चोरीसाठी स्वतंत्र कलम लागू केल्यामुळे ही आकडेवारी वाढत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

पब-बार पोलिसांच्या रडारवर

पब आणि बार संस्कृतीबाबत नागरिकांमध्ये असलेली नाराजी लक्षात घेऊन नियमभंग रोखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. सोसायट्या आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधून तक्रार येताच तत्काळ कारवाई केली जात आहे. विमाननगर येथील विनापरवाना बारवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली असून, त्या प्रकरणात पोलिस उपायुक्तांनाही स्वतंत्र तपासाचे आदेश दिले आहेत. नियम मोडणारे पब आणि बार सतत पोलिसांच्या रडारवर असतील, असा इशाराही देण्यात आला.

Pune Crime Statistics
Election Satire Poem: “चला सरूबाई, कोकणात चला…” : निवडणूक फुकटगिरीवर बोचरी उपरोधिक कविता

वाहन चोरीच्या घटनांमध्ये 18 टक्क्यांची घट

शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये 2025 मध्ये लक्षणीय घट झाल्याचे पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये तब्बल 18.40 टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली आहे. आकडेवारीनुसार 2024 मध्ये वाहनचोरीच्या 1 हजार 927 घटना नोंदवण्यात आल्या होत्या. मात्र, 2025 मध्ये हा आकडा लक्षणीयरीत्या घटून 1 हजार 572 इतका राहिला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत इतर चोरीच्या घटनांमध्ये 24.90 टक्क्यांनी घट झाली आहे. 2024 मध्ये इतर चोरीच्या तब्बल 1 हजार 522 घटना नोंद करण्यात आल्या होत्या. तर 2025 मध्ये हा आकडा 1 हजार 143 वर राहिला आहे.

गंभीर गुन्ह्यात शिक्षेचे प्रमाण वाढविण्याचे उद्दिष्ट

गेल्या वर्षी देशभरात नवीन कायद्याची अंमलबजावणी करून कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली. बीएनएस कायद्याचे प्रशिक्षण, ई-साक्ष ॲपचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात झाली. ज्या गुन्ह्यात सात वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकारचा गंभीर गुन्हा घडल्यानंतर तेथे तातडीने न्यायवैद्यक प्रयोगशाळेची व्हॅन पाठविण्यात येते. तेथील परिस्थितीजन्य पुराव्यांचे संकलन तज्ज्ञांकडून करण्यात येते. परिस्थितीजन्य पुरावे संकलन, साक्षीद्वारे गंभीर गुन्हे न्यायालयात सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. गंभीर गुन्ह्यात शिक्षेचा टक्का (कन्व्हिक्शन रेट) वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असून, हे प्रमाण पुढील वर्षात 50 टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे‌’, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केले.

Pune Crime Statistics
Jayashree Gaja Marne: गुंड गजा मारणेंच्या पत्नीला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी... बावधनमधून लढणार

गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कारवाई

शहरातील आंदेकर टोळीवर 12 गुन्हे दाखल असून, त्या पैकी चार गुन्ह्यांत पुणे पोलिसांकडून मोक्काची कारवाई करण्यात आली, तर 54 आरोपी अटकेत असून, 52 संशयितांकडून 1 कोटी 31लाख 10 हजारांची पॉपर्टी जप्त केली आहे. नीलेश गायवळ टोळीवर 11 गुन्हे, पाच मोक्का आणि 9 जणांना अटक करण्यात आली आहे. गायवळ टोळीची 18 बँक खाती गोठविण्यात आली आहे. गजा मारणे विरुद्ध 28 गुन्हे दाखल तसेच दोन मोक्काचे गुन्हे दाखल केले आहेत. या टोळीतील 16 जणांना अटक झाली आहे.

बलात्कार, विनयभंगाच्या घटनाही घटल्या

2021 पासून बलात्कार आणि विनयभंग या दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकूण वाढीचा कल कायम असल्याचे दिसून येते. तरीही मागील वर्षाच्या तुलनेत 2025 मध्ये पुणे शहरात बलात्कार आणि विनयभंगाच्या नोंदवलेल्या घटनांमध्ये घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, 2024 मध्ये बलात्काराच्या 499 घटना घडल्या होत्या, तर 2025 मध्ये हा आकडा घटून 473 वर आला आहे. मागील पाच वर्षांतील प्रमुख आकडेवारी पाहिली तर 2021 मध्ये पुण्यात बलात्काराच्या 283 घटना नोंदल्या गेल्या होत्या. 2024 मध्ये या घटनांनी उच्चांक गाठला होता. 2025 मध्ये थोडीशी घट नोंदवली असली, तरी आकडे अजूनही चिंताजनक आहेत. विशेष बाब म्हणजे 2025 मध्ये दाखल झालेल्या बलात्काराच्या जवळपास सर्वच प्रकरणांमध्ये आरोपी पीडितेच्या ओळखीचे असल्याची माहिती समोर आली आहे. विनयभंगाच्या घटनाही 2024 मधील 844 वरून 2025 मध्ये 836 इतक्या नोंदवण्यात आल्या आहेत. असे असले तरी मागील काही वर्षात या घटनांचा आलेख चिंताजनकच आहे. 2021 मध्ये 382 प्रकरणांची नोंद होती, जी 2023 मध्ये 775 वर पोहचली. 2024 मध्ये 844 घटनांची नोंद झाल्यानंतर 2025 मध्ये किंचित घट झाली आहे.

Pune Crime Statistics
Lonavala District Council Elections: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जोरदार तयारी

फसवणुकीचे गुन्हे अन्‌‍ रिकव्हरी

ऑनलाइन व्यवहार, आर्थिक आमिषे यामुळे पुणे शहरात फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मागील काही वर्षांत सातत्याने वाढ होत आहे. काही पीडितांची कोट्यवधी रुपयांची रक्कम परत मिळवण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. गुन्हे वाढत असतानाच ‌’रिकव्हरी‌’ बाबतही पुणे पोलिसांकडून काही अंशी पावले उचली जात आहेत. आकडेवारीनुसार 2021 मध्ये फसवणुकीचे 634 गुन्हे दाखल झाले होते. 2022 मध्ये हा आकडा वाढून 930 झाला, तर 2023 मध्ये 982 प्रकरणांची नोंद झाली. 2024 मध्ये फसवणुकीच्या घटनांनी मोठी उसळी घेत 1 हजार 813 प्रकरणे दाखल झाली. 2025 मध्ये मात्र गुन्ह्यांमध्ये काही प्रमाणात घट होत 1 हजार 459 फसवणुकीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गुन्ह्यांच्या संख्येबरोबरच आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले. मात्र, पोलिसांच्या तपासातून पीडितांची रक्कम परत मिळवण्यावर भर देण्यात आला आहे. 2021 मध्ये तब्बल 8 कोटी 53 लाख रुपयांची रिकव्हरी करण्यात आली. 2022 मध्ये 4 कोटी 66 लाख, तर 2023 मध्ये 2 कोटी 20 लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. 2024 मध्ये पुन्हा मोठी सुधारणा होऊन 6 कोटी 41 लाख रुपयांची रिकव्हरी झाली, तर 2025 मध्ये आत्तापर्यंत 6 कोटी 64 लाख रुपयांची रक्कम परत मिळविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news