Pune Election 2026: उमेदवारीच्या अखेरच्या दिवशी ट्विस्ट! भाजपचा प्रभाग ३ मध्ये मास्टरस्ट्रोक; उच्चशिक्षित ऐश्वर्या पठारे रिंगणात

Pune Municipal Corporation Election 2026: वडगावशेरीतील प्रभाग ३ मध्ये भाजपने ऐनवेळी उमेदवार बदलत ऐश्वर्या पठारे यांना मैदानात उतरवलं आहे. या निर्णयामुळे प्रभाग ३ आणि ४ मधील भाजप पॅनल अधिक मजबूत झाल्याची चर्चा आहे.
Aishwarya Pathare Wadgaon Sheri
Aishwarya Pathare Wadgaon SheriPudhari
Published on
Updated on

Pune Municipal Corporation Election 2026: महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपकडून वडगावशेरीत धक्कातंत्राचा वापर केल्याने राजकारणात ट्विस्ट आला आहे. सुरुवातीला प्रभाग ३ मधून सुरेंद्र पठारे लढणार असल्याची चर्चा होती. मात्र ऐनवेळी रणनीती बदलत भारतीय जनता पक्षाने प्रभाग ३ मधून त्यांच्या पत्नी ऐश्वर्या पठारे यांना उमेदवारी दिली आहे. तर सुरेंद्र पठारे हे आपल्या पारंपरिक वॉर्ड क्रमांक ४ मधून निवडणूक लढवणार आहेत.

लोहगाव–विमाननगर परिसराचा समावेश असलेल्या या प्रभागात आयटी क्षेत्रात काम करणारा उच्चशिक्षित मतदारवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर गावकी-भावकीचे स्थानिक राजकारणही येथे प्रभावी आहे. या संपूर्ण पट्ट्यात सुरेंद्र पठारे यांची मजबूत पकड आहे. अनेक वर्षांचा जनसंपर्क आणि स्थानिक प्रश्नांवर काम केल्यामुळे त्यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे. त्यांनी आपला पारंपरिक खराडी वॉर्ड क्रमांक ४ कायम ठेवत, प्रभाग ३ मधील लढत पत्नी ऐश्वर्या पठारे यांच्याकडे सोपवली आहे. त्यामुळे प्रभाग ३ मधील भाजपचे पॅनल अधिक भक्कम झाल्याचे बोलले जात आहे.

Aishwarya Pathare Wadgaon Sheri
Pune Election 2026: पुण्यात काँग्रेसच्या हाती सेनेची मशाल; मनसेच्या इंजिनबाबत चर्चा पे चर्चा; असे असेल जागा वाटप

ऐश्वर्या पठारे या उच्चशिक्षित असून त्यांनी एमआयटीमधून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आहे. भारतासह परदेशातील नामांकित आयटी कंपन्यांमध्ये त्यांनी काम केले आहे. स्वतः आयटी क्षेत्राचा अनुभव असल्यामुळे प्रभाग ३ मधील आयटी कर्मचारी, व्यावसायिक आणि तरुण वर्गाशी त्यांचा थेट संवाद आहे. या भागातील वाहतूक, पायाभूत सुविधा, पाणी, कचरा व्यवस्थापन, तसेच आयटी कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन अडचणी त्यांना माहिती आहेत.

गेल्या काही वर्षांपासून ऐश्वर्या पठारे या सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. आरोग्य, शिक्षण आणि स्थानिक समस्या सोडवण्यासाठी त्या सातत्याने काम करताना दिसतात. याशिवाय अलीकडच्या काळात सखी महिला मंचच्या माध्यमातून त्यांनी तब्बल ७,००० हून अधिक महिलांचे संघटन उभे केले आहे. महिला सक्षमीकरण, बचत गट आणि सामाजिक प्रश्नांवर त्यांनी काम केले असल्याने महिलावर्गातही त्यांचा चांगला जनाधार तयार झाला आहे.

Aishwarya Pathare Wadgaon Sheri
Pune Elections 2026: पुण्यात राजकीय उलथापालथ; भाजप-शिवसेना युती तुटली, नाना भानगिरेंनी केली घोषणा

एकूणच, प्रभाग क्रमांक ३ मध्ये उच्चशिक्षित, आयटी पार्श्वभूमी असलेली आणि सामाजिक कामाचा अनुभव असलेली महिला उमेदवार देत भाजपने राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा डाव टाकल्याचे मानले जात आहे. प्रभाग ३ आणि प्रभाग ४ या दोन्ही भागांत मजबूत उमेदवार देऊन भाजपने हे दोन्ही प्रभाग ‘सेफ’ करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी निवडणुकीत या निर्णयाचा नेमका काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news