ऑनलाइन वीजबिलात पुणे अव्वल; बिल भरण्यासाठी ग्राहकसंख्येमध्ये मोठी वाढ

ऑनलाइन वीजबिलात पुणे अव्वल; बिल भरण्यासाठी ग्राहकसंख्येमध्ये मोठी वाढ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महावितरणचे वीजबिल 'ऑनलाइन'द्वारे भरण्यासाठी वीजग्राहकांचा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. पुणे परिमंडलात गेल्या एका वर्षात वीजबिलांचा 'ऑनलाइन' भरणा करणार्‍या ग्राहकांची संख्या तब्बल 3 लाख 5 हजार 300 ने वाढली आहे. म्हणजेच 75 टक्क्यांवर पोहोचली आहे. सद्य:स्थितीत लघुदाब वर्गवारीतील सरासरी 21 लाख 38 हजार 350 (74.5 टक्के) घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहक दरमहा सुमारे 559 कोटी रुपयांच्या वीजबिलांचा 'ऑनलाइन'द्वारे घरबसल्या व सुरक्षितपणे भरणा करीत आहेत.

महावितरणच्या पुणे परिमंडलातील वीजग्राहकांनी 'ऑनलाइन' भरणा करण्यामध्ये राज्यात आघाडी कायम ठेवली आहे. लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर सरासरी 28 लाख 70 हजार 989 ग्राहक दरमहा वीजबिल भरतात. त्यातील 74.5 टक्के म्हणजे 21 लाख 38 हजार 348 ग्राहक 'ऑनलाइन'द्वारे वीजबिलांचा भरणा करीत आहेत. सन 2022 च्या तुलनेत सन 2023 मध्ये 'ऑनलाइन'साठी 3 लाख 5 हजारांनी ग्राहकसंख्येत भर पडली असून भरण्याची रक्कम देखील 129 कोटी रुपयांनी वाढली आहे.

पुणे शहरात गेल्या वर्षभरात 'ऑनलाइन'साठी पसंती दिलेल्या ग्राहकांची संख्या 1 लाख 46 हजार 300 ने वाढली असून भरण्याच्या रकमेतदेखील 59 कोटी 31 लाख रुपयांनी भर पडली आहे. सद्य:स्थितीत सरासरी 11 लाख 80 हजार 191 (73.6 टक्के) लघुदाब घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहक दरमहा 295 कोटी रुपयांच्या वीजबिलांचा 'ऑनलाइन' भरणा करत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात सरासरी 7 लाख 4 हजार 763 लघुदाब वीजग्राहक दरमहा वीजबिलांचा भरणा करत आहेत. त्यातील 5 लाख 63 हजार 85 (80 टक्के) ग्राहक 'ऑनलाइन'द्वारे दरमहा 151 कोटी 76 लाख रुपयांचा भरणा करत आहेत. सन 2023 मध्ये या ग्राहकसंख्येत 81 हजार 180 ने भर पडली असून 'ऑनलाइन' वीजबिल भरण्याची रक्कम 35 कोटी 74 हजार रुपयांनी वाढली आहे.

आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत ग्राहकसेवेमध्ये 'ऑनलाइन' सेवा अतिशय महत्त्वाची आहे. त्यास पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'ऑनलाइन' वीजबिल भरण्यासोबतच लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांना 'आरटीजीएस' किंवा 'एनईएफटी'द्वारे वीजबिल भरण्याची किमान 5 हजार रुपये करण्यात आली आहे. त्यानुसार 5 हजारांपेक्षा अधिक रुपयांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे.

– राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news