बनावट कागदपत्राद्वारे विकल्या सणस बिल्डर्सच्या पाच सदनिका | पुढारी

बनावट कागदपत्राद्वारे विकल्या सणस बिल्डर्सच्या पाच सदनिका

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सदनिका खरेदी व्यवहारात बनावट कर्ज प्रकरण तसेच बोगस दस्त नोंदणी करून बांधकाम व्यावसायिक सणस बिल्डर्सची साडेपाच कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी बँक अधिकारी, दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती सणस बिल्डर्स, आकाश चोरडिया व त्यांच्या वकिलांनी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रकरणी नितीन राजाराम पाटणकर (वय 35, रा. हातकणंगले, इचलकरंजी, जि. कोल्हापूर), पुरुषोत्तम गजानन पाटणकर (वय 38, रा. चिंचवड), मिलिंद गोसावी (वय 50, रा. कात्रज), प्राची पाटणकर (रा. कोल्हापूर), विवेक शाम शुक्ला (रा. बिबवेवाडी), एका अनोळखी व्यक्तीसह हवेली दुय्यम निबंधक कार्यालयातील निबंधक, डीबीएस बँकेतील अधिकारी, कर्मचारी, अन्य एका राष्ट्रीयीकृत बँकेतील अधिकारी, कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिक सुभाष बाबूराव सणस (वय 67, रा. सणस रेसिडन्सी, नॉर्थ मेन रस्ता, कोरेगाव पार्क) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सणस बिल्डर्सकडून बांधण्यात येणार्‍या लुल्लानगरमधील बेव्हरली हिल्स या गृहप्रकल्पाचे कुलमुखत्यारधारक विठ्ठल नारायण भोरे यांच्या नावाने आहे. येथील दोन सदनिका खरेदीसाठी अनोळखी आरोपीसह नितीन पाटणकर यांनी बनावट करारनामा केला. दस्त करून देणार्‍यासह मिलिंद गोसावी, प्राची पाटणकर, विवेक शुक्ला यांनी स्वाक्षरी केल्याचे सणस यांनी फिर्यादीत म्हटले आहे. तर अधिक माहिती घेतली असता तीन बनावट कागदपत्राद्वारे विकल्या सणस बिल्डर्सच्या पाच सदनिका सदनिका अशाच पद्धतीने विक्री केल्याचे निदर्शनास आल्याचे सणस म्हणाले. त्याबरोबरच हवेली (क्रमांक 20) दस्त नोंदणी कार्यालयातील निबंधकांनी कागदपत्रांची पडताळणी न करता दस्त नोंदणीची प्रक्रिया केली.

डीबीएस बँकेत कर्ज प्रकरण सादर करण्यात आले. बँक अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी कर्ज प्रकरणाची पडताळणी न करता सणस बिल्डर्सच्या नावे साडेपाच कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. सणस बिल्डर्सच्या नावाने बनावट खाते बँक ऑफ महाराष्ट्रात उघडण्यात आले. खात्यात जमा झालेली चार कोटी 33 लाख 98 हजार रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. सणस बिल्डर्सचे कुलमुखत्यारधारक विठ्ठल भोरे यांच्या नावाने दुसरीच व्यक्ती उभी करून बनावट करारनामा केल्याचे सणस यांनी फिर्यादीत म्हटले आहे. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर सणस यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी अर्जाची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला.

हेही वाचा

Back to top button