Pune News : लोकसभा निवडणुकीवर अवलंबून पाणीकपात | पुढारी

Pune News : लोकसभा निवडणुकीवर अवलंबून पाणीकपात

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा कमी झाला असून, तो आज 18 जानेवारीला 19.28 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे 66.12 टक्के आहे. तरीदेखील पुणेकरांचा रोष टाळण्यासाठी लोकसभा निवडणुकीचे मतदान होईपर्यंत पुणे शहरातील पाणीकपात टाळण्याचा आटोकाट प्रयत्न सत्ताधारी करतील. त्यामुळे पुणेकरांची पाणीकपात लोकसभा निवडणुकीच्या तारखेवर अवलंबून असल्याचे दिसून येते. शेतीच्या सिंचनासाठीचे रब्बी हंगामातील आवर्तन येत्या दहा दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर, पाणीसाठा कमी असल्याने, यंदाच्या उन्हाळ्यात शेतीसिंचनासाठी दोनऐवजी एकच आवर्तन देता येईल, असे नियोजन करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

गतवर्षी पावसाळा उशिरा सुरू झाला. धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाची मोठी उघडीप राहिल्याने खरीप हंगामात सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी पुरविण्यात आले. सप्टेंबरमध्ये धरणे भरली. तरीदेखील 15 ऑक्टोबरला धरणसाखळीत 27.73 टीएमसी (95.13 टक्के) पाणी होते. गतवर्षी 29.09 टीएमसी (99.77 टक्के) होते. म्हणजे गेल्यावर्षीपेक्षा 1.36 टीएमसी कमी साठा होता. मात्र, धरणसाठ्यातील फरक गेल्या वर्षीच्या तुलनेत आज 3.32 टीएमसीवर पोहोचला आहे. मुख्यत्वे शेतीसाठी रब्बी हंगामात पाणी वापरले गेले, त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत धरणसाठ्यातील पाण्याचा वापर अधिक झाला. रब्बी हंगामाचे आवर्तन गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा एक महिना लवकर सुरू करण्यात आले. तसेच सुमारे दोन महिने पाणी पुरविण्यात आले. त्यामुळे धरणांत अगोदरच कमी असलेला साठा आणखी कमी झाला.

शहराला लागणार 11 टीएमसी पाणी

पुणे शहराला रोज 1600 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी पुरविले जाते. फेब—ुवारीअखेरपर्यंत पाणीकपात करू नये, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत नोव्हेंबरमध्ये केली होती. पुणे शहराला दरमहा दीड टीएमसी पाणी खडकवासला प्रकल्पातून पुरविले जाते. सध्याच्या दैनंदिन वापराप्रमाणे यंदा 31 जुलैपर्यंतचा म्हणजे सुमारे दोनशे दिवसांसाठी सव्वाअकरा टीएमसी पाणी पुणे शहराला लागणार आहे.

सिंचनासाठी शिल्लक 5.5 टीएमसी पाणी

यंदाचा उन्हाळा दरवर्षीपेक्षा अधिक कडक असल्याचा अंदाज आहे. बाष्पिभवनामुळे साठ्यातील 1.68 टीएमसी पाणी कमी होईल. यंदाचा रब्बी हंगाम 28 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यासाठी आणखी एक टीएमसी पाणी लागेल. धरणांतील आजचा 19.28 टीएमसी पाणीसाठा विचारात घेतल्यास, पुणे शहराचा पाणीपुरवठा, सिंचनासाठीचे पुढील दहा दिवसांचे पाणी आणि बाष्पिभवन यासाठी सुमारे 13.68 टीएमसी पाणी लागेल. धरणांत साडेपाच टीएमसी पाणी शिल्लक राहील. त्यामुळे उन्हाळी पिकांच्या सिंचनासाठी एक आवर्तन मिळू शकेल.

मेमध्ये पाणी कपात

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पाच वर्षांपूर्वी 10 मार्चला लागू झाली होती, तर पुण्यातील मतदान एप्रिलमध्ये झाले होते. यंदाही एप्रिल ते मे महिन्यांत पुण्यातील मतदान होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाणीकपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पुणे शहराला दोन दिवस जेवढे पाणी लागते, सर्वसाधारणपणे तेवढे पाणी शेतीच्या एका दिवसाच्या सिंचनासाठी लागते. त्यामुळे मे आणि जूनमध्ये आठवड्यात एक दिवस पाणीकपात केली, तरी शेतीसाठी तीन-चार दिवस पाणी पुरविले जाऊ शकेल.

रब्बी हंगामातील पाणी पुरवठा

  • 25 डिसेंबर 2021 ते 15 फेब्रुवारी 2022 (52 दिवस) टीएमसी
  • 25 डिसेंबर 2022 ते 6 फेब्रुवारी 2023 (43 दिवस) टीएमसी
  • 27 नोव्हेंंबर 2023 ते 28 जानेवारी 2024 (63 दिवस) 5.5 टीएमसी

उन्हाळी हंगामातील आवर्तन

  • 12 मार्च ते 20 मे 2022 (59 दिवस) टीएमसी
  • 21 मे ते 20 जून 2022 (59 दिवस) टीएमसी
  • 1 मार्च ते 25 एप्रिल 2023 (56 दिवस) 4.85 टीएमसी
  • 1 मे ते 17 जून 2023 (48 दिवस) टीएमसी

हेही वाचा

Back to top button