

पुणे: शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या टिंबर मार्केटचे स्थलांतर करण्याचा प्रश्न तब्बल चार दशकांपासून प्रलंबित आहे. आगीच्या धोक्यामुळे टिंबर मार्केट स्थलांतराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. १९८७ च्या विकास आराखड्यातच टिंबर मार्केट शहराबाहेर हलवण्याची तरतूद केली होती. मात्र, जागेची उपलब्धता, भूसंपादन आणि अन्य प्रशासकीय अडचणींमुळे हा प्रस्ताव प्रत्यक्षात उतरू शकला नाही. आता टिंबर मार्केटमधील आगीच्या भीषण दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाला या स्थलांतराच्या प्रश्नाची पुन्हा आठवण झाली असून, पर्यायी जागेची चाचपणी सुरू केली आहे. बाणेर-बालेवाडी परिसरातील चार एकरांच्या आरक्षणाचा पर्याय यासाठी तपासला जाणार आहे.
टिंबर मार्केटच्या परिसरात मोठ्या प्रमाणात लाकडाचा साठा, व्यावसायिक दुकाने आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. शहराचा विस्तार होण्यापूर्वी टिंबर मार्केट शहराच्या सीमेवर होते. मात्र, आता शहराचा विस्तार होऊन हा परिसर दाट लोकवस्तीच्या मध्यभागी आला आहे. अरुंद रस्ते, वाढती वाहतूक आणि आगीच्या दुर्घटनांचा धोका लक्षात घेता टिंबर मार्केटचे स्थलांतर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
यापूर्वीही यासंदर्भात चर्चा झाली; मात्र, ठोस निर्णय होऊ शकला नाही. शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९७ मध्ये महापालिकेत समाविष्ट झालेल्या बाणेर-बालेवाडी परिसरात यापूर्वी कन्स्ट्रक्शन मटेरियल यार्डचे आरक्षण होते. शासनाने त्यात बदल करून गुड्स गोडाऊन अथवा मटेरियल गोडाऊनसंदर्भातील आरक्षण केले आहे. ही जागा चार एकर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मात्र, या आरक्षणासाठी संपादन प्राधिकरण कोणते असेल, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. पूर्वीच्या आरक्षणात पुणे मर्चंट चेंबर संपादन प्राधिकरण होते; नव्या आरक्षणात त्याचा उल्लेख नसल्याने शासनाकडून याबाबत स्पष्टता घ्यावी लागणार आहे. प्रक्रिया आताच सुरू केल्यास नजीकच्या काळात स्थलांतराच्या दिशेने ठोस पाऊल पडू शकते, असे पावसकर यांनी स्पष्ट केले.
टिंबर मार्केटच्या स्थलांतराबाबत आम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार आहोत. बाणेर-बालेवाडी परिसरातील चार एकर जागेवर यापूर्वी कन्स्ट्रक्शन मटेरियल यार्डचे आरक्षण होते. शासनाने त्यात बदल करून गुड्स गोडाऊन किंवा मटेरियल गोडाऊनसंदर्भातील आरक्षण केले आहे. या जागेचे संपादन प्राधिकरण कोण असेल, हे स्पष्ट करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर ही जागा संपादित करून टिंबर मार्केट स्थलांतरित करता येईल का, याची चाचपणी केली जाईल. यासाठी सर्वसहमतीने प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न असून, प्रक्रिया आताच सुरू केली तर नजीकच्या काळात त्याला गती देता येईल.
अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता, महापालिका