

पुणे: मागील सहा वर्षांत दहा किंवा त्यापेक्षा अधिक अग्निशमन वाहने लागलेल्या १४ मोठ्या आगींची नोंद अग्निशमन विभागाकडे झाली आहे. मात्र, बुधवारी मध्यरात्री टिंबर मार्केटमध्ये लागलेल्या आगीने या सर्व घटनांना मागे टाकले. आग नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल ३१ अग्निशमन वाहने तैनात करावी लागली. यापूर्वी २०२३ मध्ये भवानी पेठेतील नॅशनल टिंबर्सच्या आगीसाठी २३ वाहने लागली होती. दहा किंवा त्यापेक्षा अधिक अग्निशमन वाहने घटनास्थळी धाव घेतात, अशा भीषण आगींना ‘ब्रिगेड कॉल’ म्हटले जाते.
पुण्यात २०२१ ते २०२६ या सहा वर्षांत अशा १४ मोठ्या आगींची नोंद झाली आहे. यामध्ये २०२१ आणि २०२५ या वर्षांत प्रत्येकी चार आगी घडल्या. बुधवारी टिंबर मार्केटमधील आगीने हा विक्रम मोडीत काढत ३१ अग्निशमन वाहनांचा वापर करावा लागला. २०२१ हे वर्ष मोठ्या आगींच्या घटनांच्या दृष्टीने विशेष ठरले. दि. २१ जानेवारी रोजी मांजरीतील सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीत लागलेल्या आगीसाठी १६ अग्निशमन वाहने पाठवावी लागली. त्यानंतर दि. २६ मार्च रोजी कॅम्पमधील फॅशन स्ट्रीट मार्केटला लागलेल्या भीषण आगीसाठी १५ वाहने तैनात केली. दि. १२ सप्टेंबर रोजी पाषाणमधील बिग बास्केट परिसरातील आगीसाठी, तर दि. २५ ऑक्टोबर रोजी गंगाधाम चौकातील श्री जी लॉन्सच्या गोदामातील आगीसाठी प्रत्येकी ११ वाहने लागली.
२०२२ मध्ये नाना पेठेतील कावेरी सोसायटीच्या शेडला दि. ३१ मार्च रोजी आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दहा वाहने पाचारण करण्यात आली. त्यानंतर २०२३ मध्ये दि. २५ मे रोजी भवानी पेठेतील नॅशनल टिंबर्सच्या लाकडाच्या दुकानाला पहाटे आग लागली. ती आटोक्यात आणण्यासाठी २३ अग्निशमन वाहने लागली. सहा वर्षांतील नोंदींमध्ये ही सर्वाधिक वाहनांची संख्या ठरली.
दि. १८ जून रोजी बिबवेवाडीतील काकडेवस्ती येथे गोदामाला लागलेल्या आगीसाठी १७ वाहने, तर १४ जुलै रोजी येवलेवाडीतील शहा दीपचंद धरमचंद फर्निशिंग प्रा. लि.च्या कापड गोदामातील आगीसाठी ११ वाहने पाठवली. २०२३ मध्ये तीन मोठ्या आगींमध्ये एकूण ५१ अग्निशमन वाहनांचा वापर झाला. २०२४ मध्ये १३ जानेवारी रोजी मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकरनगर, गल्ली क्रमांक ११ येथील घराला आग लागली. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी १० वाहने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर २०२५ मध्ये पुन्हा चार मोठ्या आगींची नोंद झाली.
६ एप्रिल रोजी नाना पेठेतील भाजी मंडईजवळील वाड्याला लागलेल्या आगीसाठी १४ वाहने, २३ एप्रिल रोजी चंदननगरमधील आंबेडकर वस्तीतील आगीसाठी ११ वाहने, २६ सप्टेंबर रोजी उंड्रीतील मार्वेल आयडियल सोसायटीतील आगीसाठी दहा वाहने आणि ९ डिसेंबर रोजी सदाशिव पेठेतील रमेश डाईंगच्या टेरेसवरील आगीसाठी ११ वाहने वापरण्यात आली. भवानी पेठेतील टिंबर मार्केटमध्ये बुधवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत ४५ दुकाने, सहा घरे आणि एका वाहनाचे मोठे नुकसान झाले. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी ३१ वाहनांचा वापर करावा लागला. २०२६ मध्ये आतापर्यंत सगळ्यात मोठी आणि सर्वांत मोठा बिग्रेड कॉल ठरला.