Pune Timber Market Fire: टिंबर मार्केटच्या आगीची १६ वर्षीय श्लोकच्या प्रसंगावधानामुळे अग्निशमन दलाला वेळीच माहिती

मित्रांसह दुचाकीवरून अग्निशमन केंद्र गाठले; १० हून अधिक गाड्यांच्या मदतीने दोन तासांत आगीवर नियंत्रण, चार ते पाच सिलिंडरचे स्फोट
Timber Market Fire
Timber Market FirePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: टिंबर मार्केटमध्ये मंगळवारी मध्यरात्रीनंतर आगीच्या ज्वाळा उसळू लागल्या, तेव्हा परिसरात एकच धावपळ उडाली. आगीचे वाढते स्वरूप पाहून श्लोक तुपसौंदर या दहावी शिकणाऱ्या १६ वर्षांच्‍या विद्यार्थ्याने क्षणाचाही विलंब केला नाही. दुचाकीवरून मित्रांबरोबर त्यांनी थेट लोहियानगर अग्निशमन केंद्र गाठले. मध्यरात्री २ वाजून ५ मिनिटांनी अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाली. त्यानंतर अवघ्या चौथ्या मिनिटाला अग्निशमन दलाची पहिली गाडी घटनास्थळी दाखल झाली. संकटाच्या क्षणी एका विद्यार्थ्यांने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे अग्निशमन दलाला तातडीने मदतकार्य सुरू करता आले.

Timber Market Fire
Pune Timber Market Fire: टिंबर मार्केटमधील अतिक्रमणांमुळे अग्निशमन दलाला अडथळा; ठेकेदारावर कारवाईची मागणी

लोहियानगर अग्निशमन केंद्रापासून टिंबर मार्केटचे अंतर अवघे दोन ते तीन मिनिटांचे आहे. श्लोकने दुचाकीवरून केंद्रात जाऊन तेथील अग्निशमन जवानांना माहिती दिल्यानंतर पहिली गाडी घटनास्थळी रवाना करण्यात आली. या गाडीसोबत स्टेशन अधिकारी पंकज जगताप होते. घटनास्थळी पोहोचताच आगीचे भीषण स्वरूप त्यांच्या लक्षात आले. लाकडी देवघरांची दुकाने, प्लायवूडची दुकाने आणि मोठ्या प्रमाणातील लाकडी साहित्यामुळे आग वेगाने पसरत होती. त्यामुळे त्यांनी तातडीने लोहियानगर केंद्रातील सर्व गाड्या आणि शहरातील अन्य अग्निशमन केंद्रांतील गाड्यांनाही पाचारण केले. आगीदरम्यान चार ते पाच गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. अशा परिस्थितीत अग्निशमन जवान जिवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. या कामात रस्त्यांची अरुंदता आणि नागझरी परिसरातील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचाही मोठा अडथळा होता. एका बाजूनेच पाण्याचा मारा करणे शक्य होत असल्याने पश्चिम दिशेकडूनही आग विझविण्यासाठी गंगाधाम अग्निशमन केंद्राची गाडी बोलावण्यात आली. टिंबर मार्केटमधील अरुंद रस्त्यांमुळे एका गाडीला बाहेर काढल्याशिवाय दुसरी गाडी पुढे नेता येत नव्हती. तरीही जवानांनी वेगवेगळ्या बाजूंनी पाण्याचा मारा सुरू ठेवला.

Timber Market Fire
Pune Timber Market Fire: पुण्यात टिंबर मार्केटला भीषण आग; ४५ दुकाने, सहा घरे जळून खाक

सलग दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, या आगीत अनेकांच्या आयुष्याची पुंजी, वर्षानुवर्षे उभा केलेला व्यवसाय आणि संसार उद्ध्वस्त झाला. मध्यरात्री अचानक ओढवलेल्या या संकटाने व्यापारी आणि रहिवाशांवर मोठा आघात केला. एका बाजूला आगीच्या तडाख्यात सर्वस्व गमावलेले नागरिक, तर दुसऱ्या बाजूला जिवाची पर्वा न करता धावणारे अग्निशमन दलाचे जवान, असे चित्र या दुर्घटनेत पाहायला मिळाले. आगीची माहिती वेळेत देण्यासाठी पुढाकार घेणारे तुपसौंदर यांचे प्रसंगावधानही या बचावकार्यात महत्त्वाचे ठरले. टिंबर मार्केटमधील ही आग अग्निशमन दलासाठी यापूर्वीच्या मोठ्या आगींच्या घटनांनंतरचा चौथा मोठा बिग्रेड कॉल असल्याचे स्टेशन अधिकारी पंकज जगताप यांनी सांगितले.

Timber Market Fire
Pune Environmental Issues: पुण्याच्या पर्यावरणाची स्थिती गंभीर; महापालिका प्रशासनावर नगरसेवकांचा ठपका

४० दुकाने, गोदामांचे नुकसान

या आगीत इमाम साहेब फर्निचरवाले, महाराष्ट्र एंटरप्रायझेस (उमर महमंदजान बागवान), आरफा डिमोलिशन (मुजस्मील सम्मद), ए. के. स्क्रॅप सेंटर (सलमान शरीफ खान), अंगारशाबाबा व्यापारी संस्था (सिराज अहमद), शाहीन अहमद (गौस मोमीन), राजू टर्निंगवाले (राजू विश्वकर्मा), मोल्डिंगवाले (सतीराम यादव), अर्जुन टिंबर्स (अर्जुन राव), आयओयल एंटरप्रायझेस (समीर बांगी), स्वामी साई डिमोलिशन (संदीप पाटोळे), टर्निंग मोल्डिंग (मुबारक), लीडर स्टार ट्रेक पेटी कारखाना (साहिल शेख), महमंद यांचे भंगार दुकान, सादिक शाबही यांचे भंगार दुकान, ओम साई सागवान लाकडे (नंदभैय्या विश्वकर्मा), माँ दुर्गाकाळी शेरावाली डिमोलिशन (सुरेश अडसूळ), आलिशान (सलीम शाबही), एस. एन. एंटरप्रायझेस (अब्दुल कादर शाबही), जुने लाकूड व्यापारी (संजय म्यारवा), इरफान लांडगे यांचे फर्निचर दुकान, बजरंग सागवानी लाकडे, आसिफ शेख व ख्वाजाभाई शाबही यांचे मोल्डिंग दुकान, ख्वाजाभाई लाकूड व्यापारी, लकी वूड (फौजिया शेख), जुने फर्निचर (विजय अडसूळ), देवघर (दीपक शर्मा), ओम प्रकाश फर्निचर, कश्यप एंटरप्रायझेस (शोएब लांडगे), डिमोलिशन (अल्ताफ मोमीन), बालाजी फर्निचर (युवराज नाईकनवरे), बालाजी फर्निचर (सुभाष जैन), मातोश्री प्लाय (भरत ओसवाल), महावीर वूड डेकोर (मुस्सवर शेख अय्यास), सुपर जनरल स्टोअर्स, श्री बाबाजी मोल्डिंग (रतिकांत), बाबाजी मोल्डिंग (चिराग ओसवाल), मोरया वूड्स (सागर कांबळे), नागनेशी हार्डवेअर (देवीसिंग जेटावत), लकी डिमोलिशन (नझीर महमंद शेख) आणि मफतलाल एंटरप्रायझेसच्या वरील पत्र्याच्या शेडचे नुकसान झाले.

सात घरांतील संसारोपयोगी साहित्य खाक

आगीत अर्जुन टिंबर्सवरील खोल्यांमध्ये राहणाऱ्या शांताबाई पवार, सत्यवान तुकाराम पवार, बापूसाहेब तुकाराम पवार आणि बाबूराम तुकाराम पवार यांच्या घरांचे नुकसान झाले. तसेच सादिक ख्वाजाभाई शाबही, अतुल पाटणे आणि आसिफ इद्रीस यांची पत्र्याची व सिमेंट-विटांची घरे आगीत जळून खाक झाली. घरातील संसारोपयोगी साहित्य, कपडे, फर्निचर आणि महत्त्वाची कागदपत्रेही जळून गेली. ग्यानचंद्र यांच्या मालकीचा टेम्पो (एमएच १२ टीव्ही ७५२३) आणि एक अनोळखी दुचाकीही आगीत भस्मसात झाली.

Timber Market Fire
Pune Fergusson Road Encroachment: फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवरून महापालिकेत रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

श्लोक तुपसौंदर याच्‍यासह त्‍याच्या मित्रांनी लोहियानगर येथील अग्निशमन केंद्रात येऊन टिंबर मार्केट येथे आग लागल्‍याची माहिती दिली. त्‍यानंतर मी स्वतः अग्निशमन गाडीबरोबर जवानांसोबत घटनास्‍थळी दाखल झालो. आग मोठी असल्‍याने मी सर्व गाड्या घटनस्‍थळी पाठविण्यास सांगितले. हा १० गाड्यांच्‍या पेक्षा जास्‍त गाड्या घटनास्‍थळी दाखल झाल्‍याने कालच्‍या आगीचा कॉल हा ब्रिगेड कॉल ठरला.

पंकज जगताप, अग्निशमन अधिकारी, मुख्य अग्निशमन केंद्र

बुधवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मी आणि माझे मित्र टिंबर मार्केटमधील ६३३, गंजपेठ येथे बसलो होतो. त्यावेळी जवळच पत्र्याजवळ काहीतरी भांडण सुरू असल्यासारखा आवाज आला. तेवढ्यात इमारतीतून माझ्या भावाने 'अरे, पलीकडे आग लागली आहे,' असे ओरडून सांगितले. आम्ही वेळ न दवडता दुचाकी काढली आणि थेट लोहियानगर अग्निशमन केंद्र गाठले. तेथील जवानांना आगीची माहिती दिली. त्यांनी तातडीने आगीची नोंद करून अग्निशमन गाडी घटनास्थळी रवाना केली.”

श्लोक तुपसौंदर, विद्यार्थी (रहिवासी, गंज पेठ)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.