

खडकवासला: गांजाचे सेवन केल्याप्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल झालेल्या तीन स्वतंत्र गुन्ह्यांतील तरुणांना व्यसनमुक्ती आणि पुनर्वसनाची संधी मिळाली आहे. किरकटवाडीतील आत्मनिर्भर व्यसनमुक्ती केंद्रामध्ये एक महिन्याचे उपचार पूर्ण केल्यानंतर न्यायालयाने तिन्ही तरुणांना एनडीपीएस कायद्यातील कलम ६४-अ अंतर्गत लाभ देत संबंधित गुन्ह्यांतून निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिले. शिक्षेच्या प्रक्रियेऐवजी व्यसनमुक्त होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात परतण्याची संधी देणारी ही कार्यवाही चर्चेचा विषय ठरली आहे.
नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांजाचे सेवन केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणांमध्ये तिन्ही तरुणांविरुद्ध एनडीपीएस अंतर्गत कारवाई केली होती. त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. त्यानंतर आरोपींच्या वतीने उपस्थित वकिलांनी एनडीपीएस कायद्यातील कलम ६४-अ अंतर्गत लाभ देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त होण्याची आणि पुन्हा सामान्य जीवन जगण्याची संधी मिळावी, या उद्देशाने न्यायालयाने संबंधित तरुणांना व्यसनमुक्ती उपचार आणि पुनर्वसनासाठी पाठविण्याचे आदेश दिले. त्यानुसार तिन्ही तरुणांना किरकटवाडीतील आत्मनिर्भर व्यसनमुक्ती केंद्रात एक महिन्याच्या कालावधीसाठी ठेवण्यात आले.
आत्मनिर्भर व्यसनमुक्ती केंद्रात तिन्ही तरुणांनी एक महिन्याचा उपचार कालावधी पूर्ण केला. उपचार आणि पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्राच्या वतीने न्यायालयात सकारात्मक अहवाल सादर केला. या अहवालासह प्रकरणातील परिस्थितीचा विचार करून न्यायालयाने तिन्ही तरुणांना एनडीपीएस कायद्यातील कलम ६४-अ अंतर्गत लाभ देत संबंधित गुन्ह्यांतून निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिले.
या कार्यवाहीमुळे व्यसनाच्या समस्येकडे केवळ गुन्हेगारीच्या दृष्टिकोनातून न पाहता, योग्य उपचार आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून संबंधित व्यक्तींना समाजात पुन्हा स्थिर होण्याची संधी देण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. विशेषतः तरुण वयात व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या व्यक्तींना वेळीच उपचार मिळाल्यास त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळू शकते, हा संदेश या उपक्रमातून दिला आहे.
ही कार्यवाही पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संजय दराडे आणि अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांच्या पुढाकाराने पार पडली.
सिंहगड रोड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त विजय कुंभार, नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत, पोलिस उपनिरीक्षक सुरेश खरमाटे, सहाय्यक पोलिस फौजदार विनोद भंडलकर तसेच पोलिस अंमलदार विजय विरणक, संतोष सूर्यवंशी आणि विजयसिंग गिरासे यांनी या कार्यवाहीत सहभाग घेतला. व्यसनमुक्त समाज - सुरक्षित समाज, हा संदेश या उपक्रमातून दिला असून, व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना योग्य उपचार आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून नव्याने आयुष्य उभे करण्याची संधी मिळावी, हा या प्रयत्नामागील महत्त्वाचा दृष्टिकोन आहे.
'मिशन मेकओव्हर'मधून व्यसनमुक्तीवर भर
तरुणांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने नांदेड सिटी पोलिसांनी केलेली ही कार्यवाही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कायद्याच्या चौकटीत राहून व्यसनमुक्ती आणि पुनर्वसनाची संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. व्यसनमुक्ती केंद्रे, पोलिस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था यांच्या समन्वयातून तरुणांना सुधारण्याची संधी उपलब्ध होऊ शकते, हे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.
व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना योग्य वेळी सुधारण्याची संधी मिळणे महत्त्वाचे आहे. कायद्याच्या चौकटीत राहून अशा तरुणांना व्यसनमुक्तीच्या मार्गावर आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पालकांनीही मुलांच्या वर्तनातील बदलांकडे लक्ष देऊन त्यांच्याशी संवाद साधावा. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, करिअर आणि स्वतःच्या भविष्याला प्राधान्य द्यावे.
अतुल भोस, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नांदेड सिटी, पोलिस स्टेशन
व्यसनमुक्ती ही केवळ शारीरिक उपचारांची प्रक्रिया नसून व्यक्तीच्या विचारांत आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवण्याचा प्रवास आहे. त्यासाठी समुपदेशन, शिस्तबद्ध दिनचर्या आणि कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वाचा ठरतो. उपचार पूर्ण झाल्यानंतरही व्यक्तीने व्यसनापासून दूर राहावे, यासाठी सातत्याने मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. समाजाने अशा व्यक्तींना स्वीकारून त्यांना नव्याने आयुष्य उभे करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
सुभाष हगवणे, संचालक, आत्मनिर्भर व्यसनमुक्ती केंद्र