

पुणे: सर्व्हे ऑफ इंडियाची भूमी अभिलेख विभागाच्या मोजणीसाठी महत्त्वाची असलेली जीपीएस यंत्रणा गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली आहे. याचा परिणाम राज्यातील जमिनींच्या मोजणी प्रक्रियेवर झाला असून, अनेक मोजणी प्रकरणे रखडली आहेत. ही यंत्रणा सुरू झाल्यानंतर प्रलंबित मोजणी प्रकरणे मार्गी लावण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती भूमी अभिलेख विभागातील अधिकार्यांनी दिली.
जमिनींची अचूक मोजणी करणे, जमिनींच्या हद्दी निश्चित करणे तसेच विविध प्रकारच्या मोजणी प्रकरणांमध्ये आवश्यक तांत्रिक माहिती मिळवण्यासाठी जीपीएस यंत्रणेचा वापर केला जातो. मात्र, सर्व्हे ऑफ इंडियाची ही यंत्रणा बंद पडल्याने मोजणीच्या कामात अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी, नियोजित वेळेत मोजणी पूर्ण करण्यावर मर्यादा आल्या असून, त्याचा फटका मोजणीसाठी प्रतीक्षा करणार्या नागरिकांना बसत आहे.
यंत्रणेतील बिघाड दूर होऊन मोजणीचे काम पुन्हा सुरळीत सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. तांत्रिक अडचणीमुळे रखडलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विभागाला नियोजन करावे लागणार असून, प्रलंबित मोजण्यांचा अनुशेष भरून काढण्याचे आव्हानही राहणार आहे.
दुरुस्तीनंतर मोजणीच्या नव्या तारखा
जीपीएस यंत्रणेतील तांत्रिक त्रुटी दूर करून ती पूर्ववत सुरू झाल्यानंतर रखडलेल्या मोजणी प्रकरणांसाठी नव्याने तारखा देण्यात येणार आहेत. तसेच प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी भूकरमापकांना जास्तीत जास्त मोजणी प्रकरणे पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.