पुणे : पबजी खेळायला मोबाईल हवा म्हणून महिलेच्या गळ्यातील २ तोळे दागिने हिसकावले

पुणे : पबजी खेळायला मोबाईल हवा म्हणून महिलेच्या गळ्यातील २ तोळे दागिने हिसकावले

राजगुरूनगर (पुणे), पुढारी वृत्तसेवा : पबजी गेम खेळायला मोबाईल हवा यासाठी महिलेच्या गळ्यातील २ तोळे सोन्याचे गंठण हिसकावून नेले. हा धक्कादायक प्रकार राजगुरूनगर शहरालगतच्या राक्षेवाडीत घडला. तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेतील चोरट्याला पोलिसांनी गुरुवारी (दि. २८) जेरबंद केले. यानंतर चोरट्याने ही चोरी का केली याचे कारण समोर आले. हे कारण ऐकून पोलिस अवाक् झाले आहेत. अजय राजू शेरावत (वय १८, रा. हिंगणगाव, ता. शिरूर) असे चोरट्याचे नाव असून पोलिस त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, राक्षेवाडी परीसरात २ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी मालती रामदास भगत (रा. राजगुरूनगर) या किराणा घेण्यासाठी चालल्या होत्या. यावेळी समोरून दुचाकीवरून दोन तरुण आले. वेगाने येऊन त्यांनी भगत यांच्या गळ्यातील २ तोळयाचे गंठण जबरदस्तीने हिसकावून धूम ठोकली.

याबाबत खेड पोलिसांत याची तक्रार नोंदवली होती. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तपास केला असता माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी यांनी वापरलेली मोटार सायकल ही हिंगणगाव (ता. शिरूर) येथील एक जण वापरत आहे. त्यावरून गाडी आणि ती वापरत असणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्‍यानंतर त्याने हा गुन्हा त्याचे साथीदारसोबत केला असल्याचे सांगितले. तसेच अधिक चौकशी करता त्याला मित्रांसोबत मोबाईलवर पबजी गेम खेळायची होती आणि पैसे नव्हते म्हणून हा गुन्हा केला आहे असे पोलिसांना सांगितले. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी आरोपीला खेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news