

पुणे: साखरेच्या सातत्याने वाढणाऱ्या दराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजनांची चाचपणी सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून देशातील साखरेच्या उपलब्ध साठ्याची माहिती मागविण्यात आली असून, त्याबाबतचा अहवाल अंतिम झाल्यानंतर आवश्यक कारवाईची पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. संभाव्य कारवाईच्या चर्चेमुळे बाजारपेठेत सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले असून, व्यापारी आणि ग्राहकांकडून खरेदीचा वेगही मंदावला आहे. परिणामी, मागील आठवड्यात किलोमागे ७२ रुपयांपर्यंत पोहचलेले साखरेचे दर शनिवारी ६० रुपयांपर्यंत खाली आले. मागील आठवडाभर साखरेचे दर ६४ ते ७२ रुपयांच्या दरम्यान राहिल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
राज्याच्या बहुतांश भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाची अनिश्चितता आणि पुढील हंगामाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकरी टप्प्याटप्प्याने ज्वारी विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. मात्र, बाजारातील मागणीच्या तुलनेत ज्वारीची आवक कमी पडत असल्याने दरात तेजी निर्माण झाली आहे. आठवडाभरात ज्वारीच्या भावात क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. व्रतवैकल्यांचा श्रावण महिना सुरू असल्याने उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. विशेषतः साबूदाण्याच्या खरेदीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर साबूदाण्याच्या भावात क्विंटलमागे आणखी २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, भगरीची आवक आणि मागणी, यामध्ये समतोल असल्याने तिचे दर स्थिर राहिले. श्रावणातील धार्मिक कार्यक्रम आणि सणांमुळे नारळालाही बाजारात चांगली मागणी असून, त्याचे दर गत आठवड्याच्या तुलनेत टिकून आहेत. खाद्यतेलांनाही चांगली मागणी आहे. त्यामुळे १५ किलो/लिटरच्या डब्यामागे २५ ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे.
साखरेची दरवाढ गुळाच्या पथ्यावर
मार्केट यार्डातील गुळबाजाराची आवक आता पूर्वपदावर येऊ लागली आहे. पुणे जिल्ह्यातील केडगाव, दौंड परिसरासह सांगली भागातून दररोज सरासरी ७०० ते ८०० क्विंटल गूळ विक्रीसाठी बाजारात दाखल होत आहे. श्रावणासह सणासुदीचा काळ सुरू झाल्याने गुळाला ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. त्यातच साखरेच्या दरात झालेल्या वाढीमुळे अनेक ग्राहकांचा कल गुळाच्या खरेदीकडे वाढल्याचे व्यापाऱ्यांचे निरीक्षण आहे. बाजारात दाखल होणाऱ्या मालाच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने गुळाच्या दरातही तेजी आली आहे. गेल्या आठवडाभरात गुळाच्या किलोमागील भावात सुमारे १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या बाजारात दर्जानुसार गुळाला क्विंटलमागे ६ हजार ते ७ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. सध्या श्रावण महिन्यामुळे गुळाची मागणी चांगली असून, आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळीमुळे मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गुळाच्या दरातील तेजी पुढील काही महिने कायम राहण्याचा अंदाज व्यापारी शशांक हापसे यांनी वर्तविला.
बाजारभाव पुढीलप्रमाणे:
साखर (प्रतिक्विंटल) ६४००-६५०० रु. खाद्यतेले (१५किलो/लिटर) : - शेंगदाणा तेल २६७५-२९५०, रिफाईंड तेल २५५०-३३००, सरकी तेल २५००-२९५०, सोयाबीन तेल २२००-२६००, पामतेल २३००-२६००, सूर्यफूल रिफाईंड तेल २४००-२७००, खोबरेल तेल ४३००, वनस्पती २३००-२६०० रु. तांदूळ :- गुजरात उकडा ४४००-४६००, मसुरी ३३००-३४५०, सोना मसूरी ५५००-५८००, एच.एम.टी. कोलम ६७००-७०००, लचकारी कोलम ७०००-७५००, चिन्नौर ७२००-७४००, ११२१-१००००-११०००, आंबेमोहर (सुवासिक) १८०००-२००००, बासमती अखंड १२०००-१३०००, बासमती दुबार १००००-११०००, बासमती तिबार ११०००-१२०००, बासमती मोगरा ६५००-७५००, बासमती कणी ४०००-५०००, इंद्रायणी ६०००-७०००रु. गहू - लोकवन नं. १ ४३००-४५००, लोकवन नं. २ ३८००-४०००, नं.३ ३६००-३८००, सिहोर नं. १ ६५००-६८००, सिहोरी ५८००-६०००, मिलबर ३१०० रु.
ज्वारी :- गावरान नं. १ ६३००-६५००, गावरान नं.२ ५८००-६०००, नं.३ ५५००-५७००, दूरी नं.१ ३६००-३८००, दूरी नं. २ ३४००-३६०० रु बाजरी :- महिको नं.१ ३५००-३८००, महिको नं.२ ३२००-३४००, गावरान ३०५०-३२००, हायब्रीड २९००-२९५०रु. गूळ :- गूळ नं. १ ६३०० ते ७५००, गूळ नं.२ ६१०० ते ७०००, गूळ नं.३ ६००० ते ६३००, गूळ नं. ४ ५८००-६२००, बॉक्स पॅकिंग ६५०० ते ७५०० रु. डाळी :- तूरडाळ १००००-१३०००, हरभराडाळ ७८००-८२००, मूगडाळ ९०००-१००००, मसूरडाळ ७३००-७५००, मटकीडाळ ९५००-१००००, उडीदडाळ १००००-१२५०० रु. कडधान्ये:-हरभरा ७२००-७३००, हुलगा ६८००-७०००, चवळी ७५००-१००००, मसूर ६८००-७०००, मूग ८८००-९५००, साबुदाणा :-साबुदाणा नं.१ ८०००, साबुदाणा नं.२ ७८००, साबुदाणा नं.३ ७६०० रु. वरई भगर :-२१०००-२१५००, सावा भगर १९०००रु. गोटा खोबरे ३५०००-४०००० रु. नारळ :- (शेकडयाचा भाव) : नवा पॅकिंग २५००-२७००, मद्रास ४४००-४५००, पालकोल जुना २६५०-२७५०, सापसोल ३२००-४८०० रु.