

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचा कणा म्हणजे महापालिकेच्या हद्दीत आलेली गावे, पण या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मारलेल्या जोरदार मुसंडीमध्ये हा कणाच उखडला गेल्याचे स्पष्ट झाले. पुण्याच्या उपनगरांतील एकूण ९६ जागांपैकी तब्बल ७८ जागा भाजपने पटकावल्या. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी नऊ जागाच मिळवता आल्याने राष्ट्रवादीच्या पराभवाचे हे एक प्रमुख कारण मानले जाते.
पुण्याच्या उपनगरांमध्ये म्हणजेच महापालिकेच्या हद्दीत आलेल्या नव्या गावांमध्ये जिल्हा आणि राज्याच्या इतर ग्रामीण भागांतून मोठ्या प्रमाणावर नागरिक स्थलांतरित झाले आहेत. त्यात मराठा तसेच इतर बहुजनांचे प्रमाण अधिक असून त्यामध्ये पवार कुटुंबाला मानणाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. परिणामी या गावांमधील मतदार प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे उभे राहात असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यातील पाया हा गावांमधील मतदार होता, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये भाजपने या भागामध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्याला आता फळ येताना दिसते आहे. तसेच महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी काही मातब्बर, निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या राजकारण्यांना भाजपने पक्षात घेतल्याने त्यांची बाजू वरचढ दिसू लागली. त्याचप्रमाणे पक्षाने या भागात विशेष लक्ष केंद्रित केले. त्याचा परिणाम एवढा जबरदस्त झाला की राष्ट्रवादी काँग्रेसचा पायाच उखडला गेला.
पुण्याच्या उपनगरांमधील ९६ जागांपैकी ७८ जागा भाजपला मिळाल्या असून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या आहेत. नगर रस्ता - कळस, धानोरी, लोहगाव, खराडी, वाघोली, कल्याणीनगर, वडगाव शेरी, येरवडा या भागांत एकूण २३ जागा असून त्यातील १६ जागा भाजपला आणि प्रत्येकी चार जागा राष्ट्रवादी तसेच काँग्रेसला मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे हे वडगाव शेरी या मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांची या भागावर राजकीय पकड असतानाही त्यांच्या पक्षाला चारच जागांवर समाधान मानावे लागले आहे. जागावाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा देण्यात आल्या होत्या, पण पवार काका-पुतण्यांच्या पक्षांना बहुतेक जागी हार पत्करावी लागली. कोणत्याही पक्षातून निवडून येण्याची किमया साधलेल्या रेखा टिंगरे यांनी मात्र यंदा राष्ट्रवादीचा झेंडा कायम राखला.
औंध-पाषाण : औंध, बोपोडी, सूस, बाणेर, पाषाण, बावधन या भागांतील तीन प्रभागांतील सर्वच्या सर्व १२ जागा भाजपने पटकावल्या. हडपसर परिसर - घोरपडी, मुंढवा, मांजरी, केशवनगर, हडपसर, रामटेकडी, वानवडी, कोंढवा या उपनगरांत २४ जागा असून त्यातील १५ भाजपने, ३ राष्ट्रवादीने तर ५ काँग्रेसने मिळवल्या. एक जागा उद्धव ठाकरे शिवसेनेला गेली. मुस्लिमबहुल असलेल्या कोंढव्यात काँग्रेसला चार जागा मिळाल्या तर निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही विजय मिळवला.
सिंहगड रस्ता - वारजे, खडकवासला, नऱ्हे, धायरी, वडगाव बुद्रुक आदी भागांचा समावेश असलेल्या १७ जागांपैकी १५ जागा भाजपने मिळवल्या तर दोनच जागी राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळवता आला. निवडणुकीच्या तोंडावर विधानसभा निवडणूक लढवलेले आणि थोडक्या मतांनी हरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर सचिन दोडके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. कात्रज-कोंढवा - कात्रज, कोंढवा, बालाजीनगर, इंदिरानगर, महंमदवाडी, उंड्री आदी भागांतील २१ जागांपैकी तब्बल २० जागा भाजपने खेचल्या. भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचा हा भाग आहे.