

पारगाव: आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावठाण परिसरात गेल्या १५ ते २० दिवसांपासून बिबट्याचा वावर सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याचे दर्शन वारंवार होत असल्याने शेतकरी, महिला व लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अखेर वनविभागाला तब्बल तीन आठवड्यांच्या प्रयत्नानंतर यश आले असून मादी बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे.
वनविभागाने या परिसरात पिंजरे लावणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे हालचालींवर नजर ठेवणे तसेच स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार शोधमोहीम राबवली होती. सातत्याने करण्यात आलेल्या प्रयत्नांनंतर मादी बिबट्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले. जेरबंद केलेल्या बिबट मादीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी तिला जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात सुरक्षित हलविण्यात आले आहे.
दरम्यान, या परिसरात अजूनही बिबट्याची बछडे असण्याची शक्यता असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी एकटे बाहेर जाणे टाळावे, लहान मुलांना बाहेर सोडू नये, तसेच पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, असे आवाहन मंचर वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी विकास भोसले यांनी केले आहे.
बिबट्याचा किंवा त्याच्या बछड्यांचा वावर दिसल्यास तात्काळ वनविभागाला माहिती देण्याचे आवाहन वन परिमंडल अधिकारी आर. एम. फुलमाळी, वनरक्षक बी. एच. पोतरे, निसर्ग वन्यजीव अभ्यासक दत्ता राजगुरव यांनी केले आहे.
शिंगवे गावठाणात मादी बिबट जेरबंद झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी बछड्यांमुळे धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे वनविभागाने परिसरात गस्त वाढवली असून नागरिकांच्या सहकार्याने पुढील शोधमोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे.