

प्रसाद जगताप
पुणे: पुणे रेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. त्याकरिता लागणाऱ्या जागेचा प्रश्न निकाली लावण्यासाठी एसटीची पुणे स्टेशन येथील बसस्थानकाची जागा रेल्वेला द्यावी, अशी मागणी रेल्वे प्रशासनाने एसटी प्रशासनाला केली आहे. यासंदर्भात दोन्ही प्रशासनांत वरिष्ठ पातळीवर खलबतं सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
पुणे रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास आणि यार्ड रिमॉडलिंगसाठी तब्बल 398 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, या भव्य प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी रेल्वेला जागेची अडचण भासत असून, रेल्वेने आता पुणे स्टेशन परिसरातील एसटी बसस्थानकाची जागा मागितली आहे. यासंदर्भात दोन्ही विभागांच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू झाल्याने पुणे स्थानक परिसराचा चेहरामोहरा लवकरच बदलण्याची शक्यता आहे.
पुणे रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी पुणे रेल्वेस्थानक पुनर्विकास आणि यार्ड रिमॉडलिंग या प्रकल्पाबाबत नुकतीच माहिती दिली होती. चालू आर्थिक वर्षात हे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले होते. त्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून आता पावले उचलायला सुरुवात केली जात आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि रेल्वेगाड्यांचा विस्तार लक्षात घेता यार्डची क्षमता वाढवणे आता अनिवार्य झाले आहे. यासाठी रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या एसटी महामंडळाच्या जागेची रेल्वेला आवश्यकता भासणार आहे. परंतु, रेल्वेला ही जागा मिळणार का? हे आता वरिष्ठ पातळीवरील चर्चेअंतीच समोर येणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
ठळक वैशिष्ट्ये
रेल्वे पुनर्विकास प्रकल्पाची किंमत- 398 कोटी रुपये.
प्रमुख कामे- रेल्वेस्थानक पुनर्विकास आणि यार्ड रिमॉडलिंग.
चर्चेचा विषय- पुणे स्टेशन येथील एसटी बसस्थानकाच्या जागेचे हस्तांतरण.
प्रवाशांना फायदा- रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ आणि स्थानकावर जागतिक दर्जाच्या सुविधा.
तोटा काय- एसटी बससाठी मालधक्का परिसरात प्रवाशांना जावे लागणार.
मालधक्का परिसरात एसटीला नवीन जागा?
रेल्वे आणि एसटी प्रशासन यांच्यात या जमिनीच्या हस्तांतरणाबाबत बोलणी सुरू आहेत. रेल्वेकडून अधिकृत प्रस्ताव एसटी प्रशासनाकडे लवकरच पाठवण्यात येणार असून, त्याबदल्यात एसटीला पर्यायी जागा मालधक्का परिसरात देण्याबाबत विचारमंथन सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुणे रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी आम्ही 398 कोटींचा आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पाच्या आणि यार्ड रिमॉडलिंगच्या कामासाठी आम्हाला पुणे स्टेशन येथील एसटी बसस्थानकाच्या जागेची गरज आहे. यासंदर्भात एसटी प्रशासनाशी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.
हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग
रेल्वे प्रशासनाकडून आम्हाला पुणे स्टेशन बसस्थानकाच्या जागेबाबत मागणी प्राप्त झाली आहे. सध्या या विषयावर वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरू असून, लवकरच पुढील दिशा स्पष्ट होईल.
अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी पुणे विभाग