

पुणे: विद्यापीठ आवारातील शैक्षणिक विभागात करार पद्धतीने नियुक्त करण्यात येणाऱ्या प्राध्यापकांचे मानधन वाढवून 40 हजारांवरून थेट 50 हजार करण्यात येणार आहे. यामुळे गुणवत्तापूर्ण अध्यापनाला चालना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक शनिवारी (दि. 25) पार पडली.
या सभेत विद्यार्थी कल्याण, शैक्षणिक गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकी विचारात घेऊन अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ’कमवा व शिका’ योजनेअंतर्गत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानधनात प्रतितास रु. 55 वरून रु. 65 अशी वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे विद्यापीठावर सुमारे एक कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.
विद्यार्थी अपघात सुरक्षा विमा योजनेचा करार करण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी 40 लाखांच्या निधीची तरतूद केली. तसेच, विविध परीक्षांच्या आयोजनादरम्यान विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना सुचवण्यासाठी प्राचार्य नितीन घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी रुबी हॉल क्लिनीकबरोबर करार करण्यात येणार असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांना विविध वैद्यकीय सुविधा व आपत्कालीन सुविधा उपलब्ध होणार आहेत. अहिल्यानगर उपकेंद्राच्या सक्षमीकरणासाठी शैक्षणिक समन्वयकाची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शनी भागातून प्रभावी दर्शन व्हावे, यासाठी परिसर सुशोभीकरण आणि आवश्यक उपाययोजना करण्यासाठी डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
विद्यापीठात जागतिक दर्जाचे नृत्य संकुल उभे राहणार
भारतीय शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत विद्यापीठात 3 एकर जागेवर जागतिक दर्जाचे नृत्य संकुल उभारण्यासाठी तत्त्वत: मान्यता देण्यात आली असून, यासंदर्भात सविस्तर आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित संकुलाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम कलावंत व प्रयोगजीवी कलेचे अभ्यासक विद्यार्थी यांच्यात सुसंवाद घडण्यास मदत होणार आहे.
विद्यार्थी हित, शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि सांस्कृतिक विकास या तिन्ही बाबींचा गतिमान समतोल प्रशासनाद्वारे साधण्यात येणार असल्याचे या निर्णयाद्वारे अधोरेखित होत आहे.
प्रा. डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ