

पुणे: ‘भाजपने सांगितलेलेच ऐकण्याचे काम शिवसेनेचे नेते करत आहेत. तुम्ही भाजपकडे केवळ 15 जागा मागितल्या कशा? तुम्ही शिवसेनेला ताकद देत आहात की खच्चीकरण करत आहात? भाजपच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार आहे का?’ असे प्रश्न उपस्थित करत शिंदे सेनेच्या इच्छुक शिवसैनिकांनी शुक्रवारी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर आंदोलन केले.
पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्रित युतीमध्ये लढणार असून, दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे, तर शिवसेनेने 25 जागांची मागणी केली असताना भाजपने शिवसेनेला 15 जागा देऊ केल्या आहेत. त्यावरून नाराज झालेल्या शिवसेनेतील इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते यांनी शुक्रवारी गोऱ्हे यांच्या मॉडेल कॉलनीतील घरासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यांनी यावेळी गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे गोऱ्हे यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
‘जे कार्यकर्ते पाच वर्षे काम करत आहेत, त्यांना डावलले जात आहे. आम्ही दिलेला कामाचा अहवाल बघितला जात नाही. ज्या भागामध्ये नीलम गोऱ्हे राहतात, त्या भागामध्ये आजपर्यंत शिवसेनेचा नगरसेवक झालेला नाही. त्यांनी कधीही शिवसेना या भागात वाढू दिली नाही. नीलम गोऱ्हे आणि शिवसेनेच्या पुण्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी पक्ष निवडणुकीची तिकिटे कमर्शिअल पद्धतीने द्यायचं ठरवले आहे का?’ असा आरोप यावेळी जमलेल्या इच्छुक आणि कार्यकर्त्यांनी केला, तर एकनाथ शिंदे यांचे भाजपकडून खच्चीकरण सुरू आहे, आमची खूप आधीपासूनची ही खदखद आहे. ती खदखद व्यक्त करायला आज इथे आलो आहोत, अशाही भावना इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केल्या.
“शिवसेना कार्यकर्त्यांना चुकीची माहिती मिळाली असून, भाजपकडे 25 पेक्षा अधिक जागांची मागणी केली आहे, तसेच उमेदवारीच्या तिकीटवाटपाचा निर्णय कुणी एक व्यक्ती घेत नसून, शहरातील कोअर कमिटीतील नेते तिकीटवाटपाचा निर्णय घेतात” असे सांगत नीलम गोऱ्हे यांनी कमर्शिअल तिकीट वाटपाचा मुद्दा खोडून काढला. मात्र, अपेक्षित जागा मिळाल्या नाही, तर पक्षाच्या वरिष्ठांचा आदेश स्वतंत्रपणे लढा, असा आला तर तो देखील निर्णय घेऊ. आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांची समजूत काढली, असेही त्यांनी सांगितले.
काय होते आंदोलकांचे मुख्य आक्षेप
भाजपने सांगितलेलेच फक्त ऐकण्याचे काम शिवसेनेचे नेते करत आहेत.
जागावाटपाचा निर्णय त्यांना विश्वासात न घेता घेण्यात आला.
आठ उमेदवार बाहेरून आलेले व सहा उमेदवार प्रमोद भानगिरे यांच्या कुटुंबातील असल्याने निष्ठावंत पदाधिकाऱ्यांवर अन्याय.
जे कार्यकर्ते पाच वर्षे काम करत आहेत, त्यांना डावलले जात आहे.