

पुणे: पुण्यातील निवासी टाऊनशिप प्रकल्प उभारणी व्यवसायात अग््राक्रमावर असलेल्या ‘शापूरजी पालनजी’चा हडपसर परिसरातील गृहनिर्माण प्रकल्प बराच रखडला आहे.
2018मध्ये बुकिंग केलेल्या फ्लॅटचा ताबा खरेदीदारांना रेरा नियमानुसार 2021 पर्यंत मिळणे बंधनकारक असतानाही तो अद्याप न मिळाल्याने खरेदीदारांना मोठ्या आर्थिक आणि मानसिक त्रासास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे घर खरेदीदारांमध्ये ‘शापूरजी पालनजी’ प्रकल्पाविरोधात प्रचंड नाराजी निर्माण झाली असून, आमच्या हक्काच्या घराचा ताबा न मिळाल्यास आंदोलनाचे पाऊल उचलण्याचा इशारा खरेदीदारांकडून देण्यात येत आहे.
याबाबत माहिती देताना एक खरेदीदार म्हणाले की, हडपसर परिसरातील या निवासी टाऊनशिप प्रकल्पात घर खरेदी करताना घराचा ताबा वेळेतच देण्याची आश्वासने बांधकाम व्यावसायिकाकडून वेळोवेळी दिली गेली; परंतु प्रत्यक्ष कामाचा वेग अत्यंत मंद राहिला आहे. आमच्याकडून घेतलेल्या पैशांचा बांधकाम व्यावसायिकाने गैरवापर केला असून, व्यवहारातील पारदर्शकतेचाही अभाव असल्याचा गंभीर आरोप खरेदीदारांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (झउचउ) यांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काही घरखरेदीदारांनी स्थानिक पोलिस प्रशासनावरही निष्क्रियतेचा आरोप केला आहे.
समाजमाध्यमांवर या प्रकरणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. काही ठिकाणी राजकीय नेत्यांनाही या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रिअल इस्टेट (नियमन व विकास) कायदा 2016अंतर्गत प्रकल्प वेळेत पूर्ण करणे बंधनकारक असतानाही पुण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात अशा तक्रारी वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रावरील ग््रााहकांचा विश्वास डळमळीत होत असल्याचे चित्र आहे. राज्य सरकार आणि संबंधित प्राधिकरणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच प्रकल्प लवकर पूर्ण करावा, अन्यथा तीव आंदोलन करू, असा इशाराही घरखरेदीदारांनी दिला आहे.
आम्ही 2018 मध्ये फ्लॅट बुक केला. 2021 पर्यंत ताबा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आजही प्रकल्प अपूर्ण आहे. हक्काच्या घरात आपल्या आई-वडिलांना घेऊन जाण्याचे स्वप्न ठेवून घराची नोंदणी केली; मात्र आई-वडील गेले, तरीही अद्याप घर मिळू शकले नाही. आता बँकेचे हप्ते भरताना आणि भाड्याच्या घरात राहताना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. बांधकामाचा वेग वाढवून लवकरात लवकर ताबा द्यावा, ही आमची मागणी आहे.
एक घरखरेदीदार