

पुणे: नवीन दप्तर, नवीन गणवेश अन् नवी ऊर्जा, आत्मविश्वास घेऊन विद्यार्थ्यांनी सोमवारी शाळेत प्रवेश केला आणि त्यांचे शाळांमध्ये जंगी स्वागत झाले. सनईचे स्वर, ढोल-ताशाचा निनाद, रांगोळ्याच्या पायघड्या, कार्टून्सचे कटआउट्स...असे आनंदी वातावरण शाळांमध्ये रंगले होते. शिक्षकांनी विद्याथ्याचे औक्षण करून स्वागत केले. शाळेच्या पहिल्या दिवशी काहींची पावले शाळेकडे वळताना अडखळत होती तर काही विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंदाची पालवी फुलली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शांत असलेले शाळांचे आवार पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजले.
सुट्टीनंतर बर्याच दिवसांनी पावले शाळेकडे वळल्याने आवडत्या शिक्षकांना, मित्र-मैत्रिणींना भेटण्याचा उत्साह विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळाला. तर शाळेत सोडायला आलेल्या पालकांनीही मुलांचा शाळेत प्रवेश करतानाचा प्रत्येक क्षण छायाचित्रात कैद केला. आता नवीन मित्र-मैत्रिणींना भेटता येणार, नवीन शाळा, नवीन शिक्षक या सगळ्यांचेच कुतूहल विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर होते. एकीकडे पालकांना सोडून शाळेत जाताना काही विद्यार्थ्यांना रडू आले, तर दुसरीकडे अनेकजण मोठ्या आनंदात शाळेत प्रवेश करत होते, आपल्या पाल्याला शाळेच्या प्रवेशद्वारातून टाटा करताना पालकांचे डोळे आनंदाने पाणावले. काही विद्यार्थ्यांचे आजी - आजोबाही त्यांना शाळेत सोडण्यासाठी आले होते. शाळांमध्ये खास सेल्फी पाॅइंटही बनविण्यात आले होते. तिथे मुलांसोबत पालकही आनंदात सेल्फी क्लिक करताना पाहायला मिळाले.
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे विद्यार्थी आणि पालकांना शाळेची सविस्तर माहिती देत परिचय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अहिल्यादेवी शाळेत सरस्वती पूजन करून विद्यार्थ्यांना कागदी फुले देत स्वागत करण्यात आले. मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना सूर्यफुलांच्या बियांचे वाटप करण्यात आले तसेच योग सप्ताहालाही प्रारंभ करण्यात आला. डी.ई.एस. मुरलीधर लोहिया पूर्व प्राथमिक शाळेत अग्निहोत्र आणि गुरुकुल परंपरेची ओळख करून देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
अन् शाळेत अवतरले मिकी माऊस, डोनाल्ड डक
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे आकर्षक रांगोळ्यांच्या साक्षीने विद्यार्थ्यांचे स्वागत झाले आणि पाचवी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. रमणबाग प्रशालेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेचे प्रवेशद्वार रांगोळ्यांनी सजवले. बालकांच्या आवडत्या मिकी माऊस आणि डोनाल्ड डक या कार्टून्सनी तसेच 'एनसीसी'च्या विद्यार्थ्यांनी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. काही विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे संच देण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी सुलेखन पुस्तिका आणि पेढा देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
स्वागतासाठी रांगोळ्यांसह ढोल-ताशांचा घुमला गजर
न्यायमूर्ती रानडे बालक मंदिर येथे आकर्षक रांगोळ्यांनी शाळा परिसर सजवित विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. नवीन मराठी शाळेत विविध समाजसुधारकांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. एन.ई.एम.एस. शाळेत ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले, तर डी.ई.एस. स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
जि. प. पदाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुणे शहरासह जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांचे औक्षण, गुलाबपुष्प देऊन स्वागत आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळांनी नव्या वर्षाची सुरुवात केली. विशेष म्हणजे, यंदा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ३२ नवीन तुकड्यांना मान्यता मिळाली आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या मागणीचा विचार करून इयत्ता पाचवीच्या १७, आठवीच्या ८ तसेच सहावी आणि नववीच्या उर्वरित नवीन तुकड्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील उपस्थित होते.
क्लस्टर स्कूलच्या प्रयोगाला यश
जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणारा 'समूह शाळा' अर्थात क्लस्टर स्कूलचा प्रयोगही यशस्वी ठरत आहे. पानशेतनंतर आता राजगड तालुक्यातील पासली येथे जिल्ह्यातील चौथी समूह शाळा सुरू करण्यात आली असून, त्यामध्ये २२ दुर्गम गाव-वस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षितपणे आणण्यासाठी आणि घरी पोहचविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष वाहनव्यवस्था करण्यात आली आहे.