Pune Sasoon Hospital : पुण्यातील गुन्हेगारांसाठी ’ससून’ मोकळे रान? ‘त्यांना’ हवी कैदी पार्टीची क्रीम ड्युटी

Pune Sasoon Hospital : पुण्यातील गुन्हेगारांसाठी ’ससून’ मोकळे रान? ‘त्यांना’ हवी कैदी पार्टीची क्रीम ड्युटी

पुणे : ससूनमधून चालणारे अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट गुन्हे शाखेने उघड केले. त्यानंतर आता ससूनमध्ये गुन्हेगारांना विशेष आणि चोरट्या मार्गाद्वारे मिळत असलेल्या सुविधा व त्यामागे दडलेले 'अर्थ'कारण, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. थेट पोलिसच गुन्हेगारांना या सुविधा मिळाव्यात म्हणून खतपाणी घालतात का? हे रुग्णालय गुन्हेगारांसाठी मोकळे रान तर बनले नाही ना? असा प्रश्नदेखील यानिमित्त उपस्थित केला जात आहे.

ससून रुग्णालयात वैद्यकीय कारणाने दाखल झालेल्या गुन्हेगारांना विविध प्रकारच्या सोईसुविधा पुरविल्या जातात, हे काही नवे नाही किंवा ते पहिल्यांदाच घडते आहे, असेही नाही. कैद्याला रुग्णालयात नेण्याचा दाखला देणार्‍या डॉक्टरांपासून वॉर्डमध्ये पहारा देणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांपर्यंत हे सर्वश्रुत आहे. वैद्यकीय उपचारांसाठी दाखल झालेले सराईत गुन्हेगार ससून रुग्णालयातूनच ड्रग्ज तस्करीचे रॅकेट चालवत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता त्या गुन्हेगारांना तेथे मिळणार्‍या सोई-सुविधांची खैरात करणार्‍यांचा शोध घेऊन पोलिस पाळेमुळे खणणार का? हे पाहणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील मोठ्या गुन्ह्यातील एका अधिकारी असलेल्या न्यायालयीन बंदीला ससून रुग्णालयात स्पेशल सुविधा पुरविल्या जात असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यातच तो येरवडा कारागृहात आल्यापासून कारागृहात कमी आणि ससून रुग्णालयात जास्त कसा राहू शकतो? याचीही चर्चा झाली होती.

खरे आजारी कोण, याची चौकशी होणार का?

ससून रुग्णालयात काही गुन्हेगार आजारानिमित्त भरती होतात. परंतु, काही गुन्हेगार महिनोनमहिने ससून रुग्णालयात उपचार घेतात. अशा विशेष गुन्हेगारांना बरे होण्यासाठी उशीर का लागतो? याची चौकशी होणार का? कारागृहातच उपाचारांच्या सुविधा का उपलब्ध करून दिल्या जात नाहीत? असादेखील प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. सराईत गुन्हेगार, आर्थिक घोटाळ्यातील आरोपींचा कारागृहात तसेच कारागृहाबाहेर सवलती मिळाव्यात, यासाठी खटाटोप सुरू असतो. त्यामध्ये पोलिसांना हाताशी धरून सुविधा मिळविल्या जात असल्याचेही नुकतेच भायखळा कारागृहातील निलंबन प्रकरणातून समोर आले आहे.

असाच काही प्रकार ससूनमध्ये वैद्यकीय कारणांवरून दाखल केल्यानंतर चालत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. सूत्रांनी ऑफ द रेकॉर्ड दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारांना (कैद्यांना) कारागृहातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांची आरोपी पार्टी असते. तर ससून रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल झालेल्या कैद्यांसाठी तेथे पोलिसांचे गार्ड असतात. या दोन्ही ठिकाणी पोलिसांच्या हजेरीतच गुन्हेगारांना सुविधा कशा पुरविल्या जातात? प्रामुख्याने शनिवारी-रविवारीच पैसेवाले गुन्हेगार उपचारासाठी बाहेर कसे पडतात? उपचाराच्या नावाखाली काही गुन्हेगार दिवसभर बाहेर थांबून फोनवर बोलण्याबरोबरच नातेवाइकांच्या भेटीगाठी कशा घेतात? याचाही तपास होणे गरजेचे आहे.

न्यायालयात जमणारी गर्दी केव्हा कमी होणार?

बहुतांश प्रकरणांत न्यायालयात तारखेला आलेल्या गुन्हेगारांसोबत त्यांचे नातेवाईक किंवा टोळीचे सदस्य गर्दी करतात. या ठिकाणीही आपल्या टोळीतील सदस्याला मेसेज पोहचविला गेल्याची काही प्रकरणे यापूर्वी उघडकीस आली होती. त्यातील एका प्रकरणात तर एका कुख्यात गुन्हेगाराने कारागृहात राहून व्यापार्‍याकडे आपल्या टोळीच्या सदस्यांकरवी खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. न्यायालयात आल्यानंतर त्याने हा संदेश आपल्या टोळीतील सदस्याला दिल्याचे निष्पन्न झाले होते. त्याचबरोबर कारागृहातून चिठ्ठ्यांद्वारे देखील संदेश पुरविण्याचे काही प्रकार समोर आले होते. त्यामुळे अशा प्रकारांना आळा बसणार का? त्याचबरोबर अशा 'भाईं'भोवती जमणारी गर्दी कमी करण्यासाठी काही पावले उचलली जाणार का? हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'लक्ष्मीदर्शन'चा पायंडाच

जर असे होत असेल तर यासाठी कर्तव्यावरील पोलिस कर्मचार्‍यापासून ते डीओ अधिकारी अन् थेट प्रभारी अधिकार्‍यांना 'लक्ष्मीदर्शन' घडवून आणले जाते का? ससून रुग्णालयातील कर्मचारीदेखील यामध्ये सहभागी आहेत का? कर्तव्यावर असलेल्या पोलिसांमध्ये कोणत्या आरोपीची पार्टी करायची, याची चुरस असते. एवढेच नाही तर ते गुन्हेगारदेखील आम्हाला हेच कर्मचारी आरोपी पार्टीला हवे असल्याचे सांगतात. जेवढी गुन्हेगार पार्टी तगडी तेवढे अधिक 'लक्ष्मीदर्शन' असा जणू येथे पायंडाच पडला आहे. या सर्व प्रश्नांची उकल होणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

'तेरी भी चूप मेरी भी चूप…'

याबाबत या सर्व प्रक्रियेचा जवळून अनुभव घेतलेल्या सूत्रांनी सांगितले की, हे जे कर्मचारी ससून येथे गार्ड किंवा आरोपी पार्टी करतात, त्यांच्याकडून गुन्हेगारांना राजरोस खुलेआम मोबाईल पुरविले जातात. हे मोबाईल गुन्हेगारांच्या नातेवाइकाचे असतात किंवा या पोलिसांनी खास गुन्हेगारांसाठी खरेदी करून ठेवलेले असतात. एका मोबाईलसाठी तीन ते चार हजार रुपये घेतले जातात. तसेच नातेवाइकांना दिवसभर भेटवले जाते. दरम्यान, जे पोलिस आरोपी पार्टी करताना, गुन्हेगारांना नियमात ठेवतात त्यांना पुन्हा ही ड्युटी दिली जात नाही. तर जे पोलिस आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात गुन्हेगारांची खास बडदास्त ठेवतात त्यांनाच ही 'क्रीम ड्युटी' दिली जाते. त्यामुळे 'तेरी भी चूप मेरी भी चूप' असाच काहीसा प्रकार सध्या येथे सुरू आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news