

पुणे: गेली काही वर्षे प्रचंड चर्चेत असलेल्या ग््राीन फिल्ड मार्गासह उन्नत मार्गांना अखेर राज्य शासनाने शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची घोषणा मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यात मुंबईच्या धर्तीवर पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर हे जिल्हे आगामी काळात विकासाचे ग््राोथ इंजिन कसे ठरतील, हेच त्यांनी सांगितले.
शुक्रवारी (दि. 6) राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी 2 ते 3.25 असा तब्बल दीड तास सादर केला. यात त्यांनी राज्यातील सर्वच पायाभूत सुविधांच्या कामांची प्रशासकीय मान्यता झाल्याची घोषणा केली. मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या जिल्ह्यातील रस्त्याचे जाळे विस्तारून ते विकासात कसे निर्णायक ठरणार आहे, याचा रोड मॅप सादर केला.
...असा होणार फायदा
या सर्व विस्तारीकरणामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन इंधन बचत होईल. पर्यावरणाचा ऱ्हास कमी होऊन नागरिकांचा प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. त्यामुळे मनस्तापही कमी होईल. याशिवाय उद्योगधंदे वाढीस चालना मिळणार आहे. याशिवाय विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना पुण्याची कनेटिव्हिटी सहज सोपी आणि गतिमान होणार
पुणे ते छत्रपती संभाजीनगर चार तासांत
सध्या पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा मार्ग सर्वात खडतर आणि वेळेचा अपव्यय करणारा ठरत आहे. याबाबत उद्योजकांसह सामान्य नागरिकांच्या प्रचंड तक्रारी 2014 पासून येत होत्या. त्यावर गेली काही वर्षे हा मार्ग सहापदरी करण्याचा प्रस्ताव वारंवार चर्चेला येत होता. त्यावर अखेर शिक्कामोर्तब होऊन प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर या 192 किलोमीटर ग््राीन फिल्ड महामार्ग 14 हजार 886 कोटी रुपये खर्च करून सहापदरी केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पुणे ते शिरूर हा 53 किलोमीटर लांबीचा उन्नत महामार्ग 7 हजार 514 कोटी रुपये खर्च करून तयार केला जाणार आहे. यामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे आठ तासांचे अंतर अवघ्या चार तासांत गाठणे शक्य होणार आहे.
...असे होणार महामार्गाचे विस्तारीकरण
समृद्धी महामार्ग :- नागपूर-गोंदिया, भंडारा-गडचिरोली, नागपूर-चंद्रपूर आणि वाढवन बंदराला जोडण्यासाठी तवा-भरवीर मालवाहतूक कॉरिडॉर.
मुंबई महानगराच्या धर्तीवर पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर मार्गांवरील दोन्ही बाजू विकसित होणार.
राज्यातील 1 हजारापेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावांना सिमेंट क्राँक्रीटच्या रस्त्यांनी जोडणार, आशियाई बँकेच्या मदतीने 4 हजार 500 कोटींच्या कामांना मंजुरी.
तळेगाव-चाकण उन्नत मार्गासाठी (25 किलोमीटर) 6 हजार 499 कोटी रुपये मंजूर.
हडपसर ते यवत सहापदरीकरण (1.50 किलोमीटर) कामासाठी 5 हजार 262 कोटी रुपये मंजूर.