

पुणे: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना तसेच एसटी बसगाड्यांना टोलकरातून सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल फ्री पास उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
महाराष्ट्र शासनाने ८ सप्टेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, सार्वजनिक गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या आणि परत येणाऱ्या वाहनांना दि. ११ ते २७ सप्टेंबर या कालावधीत टोलमाफीची सवलत लागू राहील.
प्रशासनाच्या वतीने सर्व गणेशभक्तांना आवश्यक ती वैध कागदपत्रे दाखवून वेळेत पास प्राप्त करून घेण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप खडसे यांनी केले आहे.
पास मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र
वाहनचालकाचा परवाना
कर भरल्याचे प्रमाणपत्र
वाहन विमा प्रमाणपत्र
वाहन योग्यता प्रमाणपत्र
प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र
वाहतूक परवाना (ट्रान्सपोर्ट परमिट - लागू असल्यास)
पास कुठे मिळतील?
गणेशभक्तांना शासकीय सुट्यांच्या दिवसांसह इतर कार्यालयीन दिवसांत खालील ठिकाणांवरून कार्यालयीन वेळेत हे पास मिळतील.
1) प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे : ३९, डॉ. आंबेडकर रोड, संगम ब्रिजजवळ, पुणे.
2) आरटीओ आळंदी रोड कार्यालय, पुणे
3) दिवे आरटीओ कार्यालय, पुणे