

पुणे: आरटीओने आर्थिक वर्षात (सन 2025-26) 1922.12 कोटी रुपये महसूल वसूल करीत 101.42 टक्के महसूलप्राप्तीची उद्दिष्टपूर्ती केली आहे. पुणे आरटीओ कार्यालयासाठी शासनाने 1895.17 कोटींचे उद्दिष्ट निर्धारित केले होते. परंतु, त्यापेक्षा अधिकचा महसूल वसूल करण्याची कामगिरी पुणे आरटीओने केली आहे.
रस्ता सुरक्षा अंमलबजावणीअंतर्गत तपासणीत दोषी आढळलेल्या 61 हजार 509 वाहनांवर ई-तपासणी कारवाई करीत त्यातून 25.68 कोटींचा महसूल गोळा केला आहे. तसेच, 1 लाख 86 हजार 824 वाहनचालक अनुज्ञप्ती व 5 हजार 584 आंतरराष्ट्रीय वाहन परवाने जारी केले आहेत.
थकीत मोटार वाहन करापोटी 32.23 कोटी रुपये व पर्यावरण करापोटी 9.80 कोटी रुपये महसूल वसूल केला आहे. ई-लिलावाद्वारे 193 वाहनांच्या विक्रीतून 1.06 कोटींचा महसूल मिळाला.
कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात 11 लाख 18 हजार 844 वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविल्या असून, 3 लाख 45 हजार 543 नवीन वाहनांची नोंदणी केली आहे. तसेच, 56 हजार 172 पसंती क्रमांक आरक्षित करून त्यातून 73.76 कोटी रुपयांचा महसूल मिळविण्यात आला, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली आहे.
सन 2025-26 या आर्थिक वर्षात महसूलवसुली, अंमलबजावणी व आनुषंगिक कामकाजाबाबत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे. शासनाने निर्धारित केलेल्या 1895.17 कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत आरटीओ कार्यालयाने 1922.12 कोटी रुपये महसूल वसूल करीत 101.42 टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य केली. कार्यालयाकडील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे उद्दिष्ट पूर्ण करून अधिकचा महसूल प्राप्त करण्यात यश मिळाले आहे.
अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे