

पुणे: शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) यंदा झालेल्या प्रवेशप्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींची केवळ खेड तालुक्यापुरती नव्हे, तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात चौकशी केली जाईल, अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत दिली. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्वसाधारण सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेते विजयसिंह शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित करत आरटीई प्रवेशप्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. केवळ खेड तालुक्याची चौकशी न करता जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील प्रवेशप्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
त्यावर अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी शिक्षण आयुक्तांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील तक्रारींची चौकशी केली जाईल, असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनीही एकाच विषयावर दोन वेगवेगळ्या स्तरांवर एकाच वेळी चौकशी करणे उचित नसल्याचे नमूद केले.
दरम्यान, खेड तालुक्यातील आरटीई प्रवेशप्रक्रियेची सखोल चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने ही समिती गठित केली असून, खेड तालुक्यातील सर्व आरटीई प्रवेशांची पडताळणी करून १५ दिवसांत वस्तुनिष्ठ अहवाल संचालनालयाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी जिल्हा परिषदेतील विविध पक्षांच्या गटनेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन खेडसह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आरटीई प्रवेशप्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केली होती. या चौकशीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह पुणे विभागीय मंडळाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जगदाळे यांनी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.