

शंकर कवडे
पुणे: पाण्याचा तुटवडा आणि वाढत्या उष्णतेमुळे उत्पादन घटल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात घेवडा, गवार, दोडका, ढोबळी मिरची आणि पावट्याची आवक निम्म्यावर आली आहे. मात्र, बाजारात मागणी कायम असल्याने या भाज्यांच्या दरात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. रविवारी (दि. 10) गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात 90 ट्रक शेतमालाची आवक झाली असून, ती गत आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश येथून हिरवी मिरची 14 ते 15 टेम्पो, भुईमुंग शेंग कर्नाटक येथून 1 टेम्पो, इंदौर येथून 3 ते 4 टेम्पो गाजर, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 5 ते 6 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 3 ते 4 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 2 टेम्पो, हिमाचल येथून मटार 5 ते 5 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो, तर इंदौर, आग्रा, गुजरात आणि स्थानिक भागातून मिळून बटाट्याची 40 टेम्पो इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 450 ते 500 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, टोमॅटो 8 ते 10 हजार क्रेटस, हिरवी मिरची 2 ते 3 टेम्पो, काकडी 4 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 4 ते 5 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, गाजर 3 ते 4 टेम्पो, तांबडा भोपळा 12 टेम्पो, घेवडा 3 टेम्पो, पावटा 2 टेम्पो, शेवगा 2 टेम्पो, भुईमूग शेंग 150 गोणी, कांदा सुमारे 100 टेम्पो इतकी आवक झाल्याची माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी दिली.
पालेभाज्यांची आवक घटली
उन्हाळ्यातील पाणी टंचाईचा परिणाम पालेभाज्यांच्या उत्पादनावर झाला आहे. उत्पादन घटल्याने आवक कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे भाव तेजीत आहेत. कोथिंबिर आणि मेथीच्या भावात मागील आठवड्याच्या तुलनेत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि. 10) कोथिंबिरीची 80 हजार जुडी, तर मेथीची 30 हजार जुडींची आवक झाली. कोथिंबिरीची मागील आठवड्यात तुलनेत 10 हजार जुडीने तर मेथीची 20 हजार जुडीने कमी झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. कोथिंबिर जुडीला घाऊक बाजारात दर्जानुसार 10 ते 25 रुपये, तर मेथीला 10 ते 20 रुपये भाव मिळत आहे.