

पुणे: शहरात गेल्या एका वर्षात तीव श्वसनसंसर्ग आणि इन्फ्लुएन्झासदृश आजाराचे तब्बल 41 हजार 513 रुग्ण नोंदवले गेले आहेत. बदलते हवामान, तापमानातील चढ-उतार, वाढते प्रदूषण आणि दाट लोकवस्ती यामुळे श्वसनविकारांचे प्रमाण वाढत असल्याचे आरोग्यतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणावर सरकारी व खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल झाले. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीच दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण या संसर्गांना अधिक बळी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे.
पावसाळ्यानंतरचा काळ आणि हिवाळ्यात रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली. सध्या गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक वाहतूक, शाळा, महाविद्यालये तसेच कार्यालयांमध्ये संसर्ग झपाट्याने पसरत असल्याचे निरीक्षण आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
काय काळजी घ्यावी?
सर्दी-खोकल्याची लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे.
गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर, हातांची स्वच्छता राखणे आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळणे.
ताप किंवा श्वसनास त्रास असल्यास कामावर किंवा शाळेत जाणे टाळावे.
वेळेवर निदान आणि योग्य उपचार केल्यास या आजारांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येऊ शकते.
नागरिकांनी जागरूक राहून प्रतिबंधात्मक सवयी अंगीकारल्यास श्वसनविकारांचा वाढता धोका कमी होण्यास मदत होईल.
रुग्णसंख्या (जानेवारी ते डिसेंबर 2025)
श्वसनसंसर्ग आणि फ्लूसदृश आजार - 41,513, तीव अतिसार - 9005, विषाणूजन्य कावीळ - 133, टायफॉईड - 212, लेप्टोस्पायरोसिस - 21, कॉलरा - 1
हवामानातील बदल, प्रदूषण आणि गर्दीमुळे संसर्ग झपाट्याने पसरतो. नागरिकांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तपासणी करून घ्यावी, मास्कचा वापर करावा आणि हातांची स्वच्छता राखावी. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून सर्व शासकीय दवाखान्यांत तपासणी आणि औषधोपचार उपलब्ध आहेत.
डॉ. वैशाली जाधव, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका