

सुनील माळी
“हॅलो..., नाही, नाही..., मी नाही यंदा उभा राहणार...”
“का हो?”
“का म्हणून का विचारता दादा? ही अशी पैशांच्या उधळपट्टीची निवडणूक लढवायला ताकद नाही राहिली बुवा आता आपल्यात...”
“अहो, पण पैशांची उधळपट्टी गेल्या अनेक निवडणुकांपासून होतेय अन् तुम्ही त्याही वेळी निवडून आला होतात...”
“खरंय तुमचं, गेल्या दोन निवडणुकांमध्ये मी निवडून आलो होतो, पण दोन कारणांमुळं आता मी लढणार नाहीये. एकतर माझ्याबरोबरच्या पॅनेलमध्येही खर्च करायला तयार असलेली मंडळी हवीत ना?... आमच्या प्रभागातले सगळे इच्छुक फारसा खर्च करू शकणारे नाहीयेत. त्यामुळं सगळा भार माझ्यावरच पडणार. सगळ्या पॅनेलचा निवडणूक खर्च किती होईल, तु्म्हाला कल्पना आहे का?... अहो, संपूर्ण पॅनेलला किमान तीन कोटी हवेत तीन कोटी... प्रत्येकानं एक-एक कोटीचा भार उचलला तर निवडणूक विनमध्ये येईल. माझी त्याला तयारी आहे, पण इथं खर्चाची जबाबदारी माझ्यावरच पडणार आहे. मी एकटा कुठं तीन कोटी खर्च करू?”
“आणि न लढण्याचं तुमचं दुसरं कारण कोणतं?”
“हां... दुसरं कारण म्हणजे लोक काय वाटेल ते मागायला लागलेत हो..., मी एका हायफाय लोकांच्या सोसायटीत परवा गेलो होतो. आता भरपूर श्रीमंत असलेल्यांची ती सोसायटी. तरी लोक कसं म्हणतात मला? आमच्या सोसायटीतल्या टाईल्स बदलून द्या. काही जण सोसायटीचं रेलिंग करून मागतात तर काही जण सोसायटीला कलरिंग करण्याची डिमांड करतात. एकानं तर सोसायटीची लिफ्ट दुरुस्त करून मागितली. कुठंकुठं करायचा खर्च?... मी काय म्हटलं त्यांना मी करतो खर्च, पण निवडणुकीत मला मत द्या, मी निवडून आलो की ही कामं लगेच करून देतो, माझ्यावर विश्वास ठेवा... त्यावर तो काही बोललाच नाही, पण दुसऱ्या दिवशी समोरच्या पार्टीतल्या इच्छुकानं लगेचच काम सुरू केलं. झालं... माझी मतं गेली ती.”
“अरे बापरे... समोरची पार्टी खूपच स्ट्रॉंग आहे का?”
“स्ट्राँग?... सुपर स्ट्राँग. अहो, समोरच्या पॅनेलमधल्या एकानं आपली जमीन विकलीये काही कोटींना... फक्त इलेक्शनसाठी... आहात कुठं? आता आपण कसे पुरे पडणार त्यांना? तुम्हीच सांगा? ते आता जबरी खर्च करणार इलेक्शनमध्ये. फार पुढच्या चाली खेळायला लागलेत हे कँडिडेट आता. मतदार ते मॅनेज करतातच, पण गेल्या वेळेला माझ्या पॅनेलमधल्या चक्क एका लेडीज उमेदवारालाच त्यांनी मॅनेज केलं होतं... व्होटिंग सुरू होऊन चार तास झाले तरी त्या उमेदवार दिसनात. मग मी त्यांच्या घरी गेलो तर त्या काय करत असलेल्या मला दिसल्या? अहो, चक्क पोळ्या करत होत्या त्या. ‘घरच्यांचं जेवण बनवून मग मतं मागायला येते’, म्हणाल्या त्या. मी म्हटलं ‘मी तयार जेवण पाठवतो, पण तुम्ही माझ्याबरोबर बूथवर चला...’, त्यांना घेऊन संध्याकाळपर्यंत सगळे बूथ फिरलो अन् दाखवून दिलं आमचं पॅनेल एकत्र आहे.” 8पान 5 वर
”मला एक सांगा. तुम्ही एक आता लढायचं नाही म्हणताय, पण असा खर्च करून कॉर्पोरेशनमध्ये गेलेले कसं वागतात ?”
”कसं वागतात ?... तुम्हाला राजकारणाची काहीच माहिती नाही, म्हणायची मग. अहो, जेवढा पैसा इलेक्शनमध्ये ते खर्च करतात ना, त्याच्या अनेकपट ते वसूल करतात. आपला स्वभाव तसला नाही, आपण काही तसे पैसे मिळवू शकणार नाही. आता गेल्या टर्मला मी नगरसेवक नव्हतो तरी लोकांची कामं करून घ्यायला कॉर्पोरेशनमध्ये जायचो अन् कामं करवून घ्यायचो. आता आपण कायदेशीर कामंच घेऊन जायचो लोकांची, मग मला कसली आलीये चिंता ?... निवडून आल्यावर जी कामं करायची ती निवडून न येताही मी करू शकतो. फरक काय उरला मग ? फरक एवढाच की नगरसेवक झालो तर जनरल बॉडीतल्या सोफ्यावर बसता येतं एवढंच... मला आता काही वाटत नाही त्याचं... म्हणून मी सांगून टाकलं पार्टीच्या अध्यक्षांना, मी अर्ज केला असला तरी पॅनेलमध्ये माझं नाव टाकू नका.
”मग त्यांनी काय उत्तर दिलं ?”
”काय म्हणणार ? नवे कँडिडेट शोधू म्हणाले.”
”मला एक सांगा... तुमच्यासारखे जुने, भरवश्याचे मातब्बर खेळाडू असेच जात राहिले दुसऱ्या पार्टीत तर पार्टीचे किती जण निवडून येणार ?”
”तुमचा प्रश्न खराय. आधीच खात्रीनं निवडून येतील, असे नऊ का दहाच जण होते. त्यातले एक एक जण असे गळायला लागले तर पार्टीच्या नावावर दोन जागा तरी लागतील का ? जाऊ दे. पार्टीची काळजी करायला नेते खंबीर आहेत. मी काय नेता नाही. चला, बराच वेळ झाला, भेटूयात...”