

Pune Municipal Election Alliance 2026: पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना (उद्धव ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांमुळे नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळत आहे.
यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे काँग्रेस नेते सतीश पाटील आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांच्यात झालेली रात्रीची बैठक. या बैठकीत पुण्यातील राजकीय परिस्थिती, महापालिका निवडणूक आणि संभाव्य युतीवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे, या चर्चेनंतर लगेचच मनसे आणि उद्धव ठाकरे गटाचीही स्वतंत्र बैठक पार पडली. त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्याचे काम सुरू आहे.
स्थानिक नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी काँग्रेससोबत चर्चा झाली आणि त्यानंतर मनसेसोबतही चर्चा करण्यात आली. “आम्ही एकत्र निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनेच बोलणी करत आहोत. जागावाटपावर अजून चर्चा सुरू आहेत. त्यासाठी दोन-तीन फेऱ्या होतील. सर्व बाबींवर एकमत झाल्यानंतरच अधिकृत घोषणा केली जाईल,” असं स्थानिक नेत्यांनी सांगितलं आहे.
मनसे आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतील जागावाटपाबाबत चर्चाही सध्या सकारात्मक टप्प्यावर असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या प्रभागांमध्ये शिवसेनेची ताकद आहे, तसेच काही ठिकाणी मनसेचा प्रभाव आहे, त्या सर्व जागांचा विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल, असा विश्वास स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.
पुणे महापालिकेच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाले आहेत. भाजपची ताकद वाढलेली असताना, विरोधी पक्ष एकत्र येऊन भाजपला आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचं या हालचालींमधून दिसत आहे. ठाकरे बंधूंची एकजूट, त्यात काँग्रेसची साथ यामुळे पुण्यात एक नवं राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते पुढील बैठकींकडे आणि जागावाटपावर होणाऱ्या अंतिम निर्णयाकडे.