

पुणे: महानगरपालिका बंडगार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रावेत येथे 700 मिमी व्यासाच्या जागतिक मुख्य जलवाहिनीला मोठी गळती आढळून आली आहे. रावेत येथील नाल्यात ही गळती झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे कळस माळवाडी, जाधववस्ती, गणेशनगर (बोपखेल), विश्रांतवाडी अंशतः, म्हस्केवस्ती, संजय पार्क, बर्माशेल, विमानतळ व सभोवतालच्या परिसरातील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी याची नोंद घेऊन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महानगरपालिका बंडगार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रावेत येथे 700 मि.मी. व्यासाच्या जागतिक मुख्य जलवाहिनीला मोठी गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, संबंधित ठिकाण दलदलीचे आहेत. जलवाहिनीवर विद्युत केबल्स, इंटरनेट केबल्स, ड्रेनेज लाईन, पावसाळी लाईन अशा विविध सेवा वाहिन्यांचे जाळे पसरलेले आहे.
त्यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दिवसरात्र प्रयत्न करूनही गळती बंद करणे शक्य झालेले नाही. तांत्रिक व सुरक्षिततेच्या दृष्टीने या जलवाहिनीची दुरुस्ती करण्याऐवजी त्या ठिकाणी नवीन पर्यायी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे.
ही जलवाहिनी सुमारे 20 फूट खोल असल्याने तसेच परिसर दलदलीचा व सेवावाहिन्यांनी व्यापलेला असल्यामुळे काम करताना मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
दरम्यान, या कालावधीत जागतिक मुख्य लाइन बंद करण्यात आली असून त्या लाइनवरून पाणीपुरवठा होणाऱ्या भागांना पर्यायी लाईनमधून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण होईपर्यंत काही भागांमध्ये कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी याची दखल घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.