

पुणे: सेवानिवृत्त 87 वर्षीय मेजरचे धनादेशपुस्तक चोरी करून तब्बल 1 कोटी 11 लाख 93 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांच्याकडे काम करणाऱ्या केअर टेकरने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने ही फसवणूक केली आहे.
पेन्शन काढण्यासाठी गेल्यानंतर बँक खात्यातील पैसे कमी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर मेजर यांनी बँकेला कळविले होते. एक व्यक्ती त्यांचा धनादेश घेऊन बँकेत आली होती. बँकेने ही माहिती लष्कर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी केअर टेकरचा साथीदार सुप्रीतसिंग भूपेंद्र कंडारिया (वय 39, रा. कोथरूड) याला अटक केली आहे. तर, मुख्य सूत्रधार केअर टेकर राज शहा आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सेवानिवृत्त मेजर बोमन इरुशॉ अमारिया (वय 87) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार मार्च 2025 ते 28 जानेवारी या कालावधीत घडला आहे.
सेवानिवृत्त मेजर बोमन अमारिया यांना मुलबाळ अथवा वारसदार नाही. ते एकटेच असल्याने त्यांनी राज शहा याला केअर टेकर नेमले होते. मात्र, तो फरार झाला. त्याने जाताना आपल्यासोबत बोमन यांच्या बँक खात्याचे धनादेशपुस्तक चोरून नेले. काही काळाने ते वृद्धाश्रमात राहायला गेले. त्यांच्या बँक खात्यात पेन्शन जमा होत होती. ते वृद्धाश्रमात गेल्यानंतर केअर टेकर राज शहाने सुप्रीतसिंग कंडारिया व इतरांच्या मदतीने त्यांच्या बँक खात्यातून धनादेशाद्वारे पैसे काढले. त्यावर बनावट सही करून वेळोवेळी 1 कोटी 11 लाख 93 हजार 900 रुपयांची रक्कम काढली.
बँक खात्यातील पैसे कमी झाल्याचे बोमन यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी बँकेसोबत संपर्क साधला. त्यांनी बँकेला सांगितले की, जर कोणी माझ्या नावाच्या धनादेशाद्वारे पैसे काढण्यास आला तर तुम्ही ही माहिती मला किंवा पोलिसांना द्या. कॅम्पमधील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत सुप्रीतसिंग हा पैसे काढण्यासाठी आला. बँकेतील अधिकाऱ्याच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी लष्कर पोलिसांना ही माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याला पकडले. केअर टेकर राज शहा आणि त्याचे इतर साथीदार अद्याप फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
केअर टेकरला होती बँक खात्याची माहिती
शहा याला मेजर बोमन यांच्या बँक खात्याची सर्व माहिती होती. तोच त्यांचे सर्व व्यवहार पाहत असे. त्याच संधीचा फायदा घेत त्याने धनादेशपुस्तक चोरी करून बोमन यांच्या सह्या अगोदरच त्यावर घेऊन ठेवल्या असाव्यात किंवा त्याने बनावट सह्या केल्या असाव्यात, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.