

सुवर्णा चव्हाण
पूर्वी गोखलेनगर - वाकडेवाडी या प्रभागात (क्रमांक 7) काँग््रेास आणि राष्ट्रवादी काँग््रेासचा मोठा प्रभाव होता. परंतु, महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत या प्रभागात भाजपचे चार उमेदवार निवडून आले आणि चित्र पालटले. भाजपने या प्रभागात वर्चस्व प्रस्थापित केले. पण, 2026 च्या निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागात राष्ट्रवादी काँग््रेासने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीचे तीन उमेदवार आणि भाजपचे एक उमेदवार निवडून आले असून, या प्रभागातील राजकीय चित्र यामुळे पालटले आहे.
गोखलेनगर-वाकडेवाडी हा प्रभाग शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने राजकीय दृष्टीने नेहमीच चुरशीचा प्रभाग राहिला आहे. या प्रभागातील राजकीय समीकरण निवडणुकांच्या निकालात नेहमी बदलत गेल्याचे दिसेल. पूर्वी काँग््रेास आणि राष्ट्रवादी काँग््रेासचा प्रभाव होता. पण, 2017 महापालिकेच्या निवडणुकीत चित्र बदलले आणि भाजपचे उमेदवार निवडून आले. 2026 च्या निवडणुकीत तर समीकरण आणखीनच बदलले आणि घड्याळाने आपली चमक दाखवली. या प्रभागात भाजप आणि राष्ट्रवादी काँग््रेास यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. गोखलेनगर-वाकडेवाडी या प्रभागामध्ये गोखलेनगर, वाकडेवाडी, पाटील इस्टेट, मुळा रस्ता असा वस्तीचा भाग आहे. येथील मतदारांनी पुढे येऊन मतदानाला चांगला प्रतिसाद दिला. तर सकाळनगर, पंचवटी, पत्रकारनगर, सेनापती बापट रस्ता, बाणेर रस्ता, औंधचा येथील काही भाग येथे सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय मतदारांची संख्या मोठी असून, त्यांनीही विकासाच्या विषयाला महत्त्व देत मतदानाला प्रतिसाद दिला. निवडणुकीच्या प्रचारात सर्व पक्षांमधील उमेदवारांनी नागरिकांना वाहतूक कोंडी, ड्रेनेज लाईनचे व्यवस्थापनाचा प्रश्न सोडविणे, सुरळीत पाणीपुरवठा, वस्त्यांमधील कचऱ्याच्या प्रश्न सोडवू अशी कामे करण्याचे आश्वासन दिले. त्याला अनुसरून मतदारांनी मतदान केल्याचे निकालावरून पाहायला मिळाले.
हा प्रभाग भाजपचा बालेकिल्ला आहे, असे मानले जायचे. पण, 2026 च्या निवडणुकीत भाजपसह काँग््रेास, राष्ट्रवादी काँग््रेास, शिवसेना, मनसे अशा सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली. काहींनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली तर काहींनी अनुभवींना. तर काहींनी जुना पक्ष सोडला आणि त्यांना नवीन पक्षात उमेदवारी मिळाली. भाजपमध्ये यंदाच्या निवडणुकीत तिकीट वाटपावरून नाराजी नाट्यही रंगले. 2017 मध्ये विजयी झालेल्या रेश्मा भोसले यांना पुन्हा तिकीट मिळाले तर यंदा आदित्य माळवे यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी सायली माळवे यांना भाजपकडून तिकिट मिळाले. हरिश निकम, निशा मानवतकर यांनाही भाजपकडून संधी मिळाली. तर या प्रभागातील काँग््रेासचा अनुभवी चेहरा असलेल्या दत्ता बहिरट यांनी राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये प्रवेश केला आणि त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली. तर याच पक्षाकडून अंजली ओरसे, ॲड. नीलेश निकम, आशा साने यांना तिकीट मिळाले. 2017 मध्ये निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी प्रभागाच्या विकासासाठी गेल्या काही वर्षांत काहीच केले नाही, असा नाराजीचा सूर नागरिकांमध्ये पाहायला मिळाला.
बदल हवा, यादृष्टीने नागरिकांनी मतदान करण्यास प्राधान्य दिले. प्रभागातील अ गटात भाजपच्या उमेदवार निशा मानवतकर यांची राष्ट्रवादी काँग््रेासच्या उमेदवार आशा साने यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळाली. निशा मानवतकर यांनी विजयी पताका फडकवत हा गड राखला. पण, तरीही भाजपला संपूर्ण प्रभागात अपेक्षित यश मिळाले नाही. फक्त एकाच जागेवर समाधान मानावे लागले. बदल हवा, याच विचाराचे प्रतिबिंब अंतिम निकालात पाहायला मिळाले. ब, क आणि ड गटात राष्ट्रवादी काँग््रेासच्या उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांना चांगलीच टक्कर दिली आणि या चुरशीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. ब गटातून अंजली ओरसे, क गटात ॲड. निलेश नीकम आणि ड गटात दत्ता बहिरट यांनी विजयी झेंडा फडकावला. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र यंदाच्या निवडणुकीत रंगले. भाजपला आपला बालेकिल्ला राखता आला नाही. पण, राष्ट्रवादीचे चेहरे चमकले. एकूणच प्रस्थापितांना एकाच जागेवर आणि नव्यांना तीन जागा मिळाल्या. यामुळे प्रभागातील राजकीय चित्र पुन्हा एकदा पालटले.
ॲड. नीलेश निकम आणि दत्ता बहिरट यांच्यासारख्या अनुभवींनी आपल्या प्रभागातील जनसंपर्क टिकवून ठेवला. राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांनी एकत्रित प्रचार केल्यामुळे तीन जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. नागरिकांनी विकासाचा मुद्दा समोर ठेवून मतदान केले आणि त्याचेच प्रतिबिंब अंतिम निकालात पाहायला मिळाले.