Pune Monsoon Rain Update: पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी; अनेक भागांत पाणी साचले, नागरिकांना दिलासा

कात्रज, वारजे, खडकवासला, कोरेगाव पार्क, हडपसरसह विविध भागांत अचानक पावसाने हजेरी लावत उकाड्यापासून दिलासा दिला, मात्र अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आणि जलभराव झाला
Rain
RainPudhari
Published on
Updated on

जून महिना अर्धा संपला तरी मान्सूनचे आगमन झाले नसल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या कात्रज परिसरातील नागरिकांना रविवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसाने दिलासा मिळाला. परिसरात अर्धा तास जोरदार पाऊस पडल्याने रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. तसेच, वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने नागरिकांचे डोळे आकाशाकडे लागले होते. जून महिना संपत आला असतानाही अपेक्षित पाऊस न झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

रविवारी सकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर अचानक काळे ढग दाटून आले आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. अवघ्या अर्ध्या तासात झालेल्या दमदार पावसामुळे कात्रज चौक, अंतर्गत रस्ते तसेच प्रमुख मार्गांवर पाणी साचले. काही ठिकाणी रस्ते जलमय झाल्याचे चित्रही दिसून आले. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा आणि संथ वाहतुकीचा सामना करावा लागला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेला उकाडा आणि वाढलेले तापमान या पावसामुळे कमी झाले. परिसरात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Rain
Pune Garbage Dumping Protest: फुरसुंगी-उरुळी देवाचीमध्ये ओपन डम्पिंगविरोधात ग्रामस्थ आक्रमक

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र, रविवारी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने हा दावा फोल ठरल्याचे चित्र वारजे, कर्वेनगर, शिवणे आणि उत्तमनगर परिसरात दिसून आले. अनेक ठिकाणी रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला. दुपारनंतर सुमारे दोन तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे कर्वेनगर, वारजे माळवाडी, शिवणे, उत्तमनगर, तसेच कोंढवे धावडे परिसरातील रस्ते जलमय झाले होते. उत्तमनगर येथील शाळेच्या आवारात तसेच मुख्य रस्त्यावर पाणी तुंबल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. कोंढवे धावडे येथील मुख्य रस्त्यावरील पुलावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

वारजे येथील अतुलनगर परिसरातून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले. रस्त्यालगतच्या नाल्यांमध्ये पाणी वाहून जाण्याचा मार्ग अडथळ्यांनी भरलेला असल्याने आणि नालेसफाईची कामे अपुरी राहिल्याने महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवर पाणी साचले होते. पहिल्याच पावसात उद्भवलेल्या या समस्यांमुळे नागरिकांनी प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

धायरी, खडकवासला, किरकटवाडी परिसरात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेच्या पावसाळापूर्व नियोजनाचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अवघ्या काही तासांच्या पावसात अनेक मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. परिसरातील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्रही दिसून आले. पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची मोठी कसरत झाली.

Rain
Pune RTO School Bus Safety: पुण्यात स्कूल बस-व्हॅन तपासणी मोहीम सुरू; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आरटीओची कडक कारवाई

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, पाणी निचरा व्यवस्था आणि रस्त्यांची दुरुस्ती केल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला, तरी पहिल्याच दमदार पावसात या दाव्यांची पोलखोल झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिसरातील अनेक भागांत पाणी तुंबल्याने नागरिकांनी महापालिकेच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होते. पाणी निचऱ्याच्या समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत नसल्याचे रहिवासी कुणाल इंगळे यांनी सांगितले.

कोथरूड परिसरात रविवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन काळे ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे परिसरात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. परिसरातील कर्वे रस्ता, पौड रोड, गुजरात कॉलनी, मयूर कॉलनी, आयडियल कॉलनी, कोथरूड गावठाण, सुतारदरा, रामबाग कॉलनी, शास्त्रीनगर, भुसारी कॉलनी, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर आदी भागांत मुसळधार पाऊस झाला.

काही वेळांतच अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिक आणि व्यावसायिकांची धांदल उडाली. पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. पौड रोडवर सायंकाळी वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचे चित्र दिसून आले. रहिवासी प्रीतम मेहता म्हणाले, की मान्सूनचे आगमन झाल्याचे समाधान आहे. मात्र, जोरदार पाऊस होऊन धरण साखळीत पाणीसाठ्यात वाढ होऊन पाणी कपातीचे संकट दूर होणे गरजेचे आहे.

Rain
Pune Police Attack Case: बाणेर पोलिसांवर घरफोडी आरोपीचा चाकू हल्ला; स्वसंरक्षणार्थ गोळीबारात सराईत जखमी

पुण्याच्या पूर्व भागातील येरवडा, खराडी आणि चंदनगर परिसरात रविवारी सायंकाळी चारनंतर विजांच्या कडकडासह हलक्या सरी बसरल्या. मान्सूनचे आगमन झाले असले, तरी नागरिकांना अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. काही भागांत पावसाचा शिडकाव झाल्याने रस्ते ओले झाले होते. या पावसामुळे काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी सरी थांबल्यानंतर पुन्हा उकाडा वाढला. दरम्यान, वातावरणात सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. दुपारनंतर ढग दाटून आल्याने काहिसा दिलासा मिळाला. विजांच्या कडकडाटामुळे सर्वत्र पावसाची चिन्हे दिसत असताना काही भागातच हलक्या सरी बरसल्या.

ताडीवाला रस्ता, कोरेगाव पार्क आणि कॅम्प परिसरात रविवारी दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. कोरेगाव पार्क परिसरातील काही भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून आले. तर पुणे रेल्वे स्थानक परिसरात वाहनचालकांना सावधगिरीने वाहन चालवावे लागल्याने वाहतुकीचा वेग काही काळ मंदावला. पावसामुळे पादचारी आणि दुचाकीस्वारांची काहीशी तारांबळ उडाली. अनेकांनी आडोशाचा आधार घेत पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. हवामानातील बदलामुळे येत्या काही दिवसांतही पावसाची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Rain
Pune Vegetable Prices: पाण्याच्या टंचाईचा फळभाज्यांवर परिणाम; पुण्यात आले, काकडी, फ्लॉवरसह अनेक भाज्या महागल्या

वडगाव शेरी परिसरात रविवारी दुपारनंतर पडलेल्या रिमझिम सरींमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातारवण आहे. मात्र, अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अल्पकाळ पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. परिसरात सकाळपासूनच उष्णता आणि दमट वातावरण जाणवत होते. दुपारनंतर अचानक आकाशात ढग दाटून आले आणि रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या हलक्या सरींमुळे परिसरातील वातावरण प्रसन्न झाले. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे या पावसाने काहिसा दिलासा दिला. मात्र, नागरिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

फुरसुंगी परिसरात रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास सुमारे अर्धा तास हलका पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. परिसरात दुपारनंतर आकाशात ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसाची प्रतीक्षा नागरिकांना होती. मात्र, केवळ शिडकाव झाल्याने रस्ते ओले झाल्याचे चित्र दिसून आले. पाऊस सुरू झाल्यानंतर काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसानंतर परिसरात थंडावा जाणवत होता. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असले, तरी खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.

हडपसर आणि मांजरी परिसरात रविवारी दुपारनंतर हलक्या सरी बरसल्या. या पावसाचा फारसा जोर नसला, तरी सुमारे अर्धा तास पडलेल्या सरींमुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला. गेल्या काही महिन्यांपासून परिसरात तापमान वाढल्याने उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांचे लक्ष आकाशाकडे लागले होते. रविवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या रिमझिम पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. यामुळे उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला. मात्र, परिसरात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Rain
Pune Sugar Prices: साखरेच्या दरात पुन्हा तेजी; पुण्यात क्विंटलमागे ५० रुपयांची वाढ

सिंहगड रस्ता परिसरात रविवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता, तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्रही दिसून आले. लगडमळा येथे रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. दांडेकर पूल, राजाराम पूल, विठ्ठलवाडी, हिंगणे खुर्द, आनंदनगर, माणिकबाग, महादेवनगर, गणेश कॉलनी, तुकाईनगर, वडगाव बुद्रुक, नऱ्हे, आणि वडगाव खुर्द परिसरात काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. काही रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. अनेक दुचाकी वाहने पाण्यात अडकून बंद पडल्याच्या घटनाही घडल्या. वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली. दरम्यान, परिसरात सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. दुपारनंतर अचानक आभाळ दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली. यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला.

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच सिंहगड परिसरात देखील जोरदार पाऊस झाला. मात्र, धरण साखळीत पाणीसाठ्यात भर पडण्यासाठी अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. साखळीत सध्या ३.९० टीएमसी (१३.३९ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. पानशेत-वरसगाव धरण परिसर, तसेच राजगड-तोरणा परिसरात दिवसभर आभाळ दाटून आले होते. पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते; मात्र प्रत्यक्षात या भागांत पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

सिंहगड परिसरात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना गती मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ कोरडी पडलेली जमीन भिजल्याने पिकांच्या उगवणीसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हा पाऊस शेतीसाठी लाभदायक ठरणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या पावसामुळे मशागतीच्या चालना मिळणार असल्याने शेतकरी समाधानी आहेत. येत्या काही दिवसांत मान्सून अधिक सक्रिय होऊन पानशेत, वरसगाव, तसेच राजगड-तोरणा परिसरातही समाधानकारक पाऊस पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news