

पुणे: घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या बाणेर पोलिसांच्या पथकावर एका सराईत गुन्हेगाराने चाकूने हल्ला केला. त्यामध्ये एका सहायक पोलिस निरीक्षकांच्या दंडाला जखम झाली असून, त्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात सराईताच्या पायाला गोळी लागली. पोलिसांवर हल्ला करण्यापूर्वी या सराईताने स्वतःच्या गळ्यावर दोन्ही बाजूने ब्लेडने वारदेखील करून घेतले आहेत. या वेळी त्याचा एक साथीदार फरार झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. २0) सकाळी सहा वाजेच्या सुमारास रामटेकडी परिसरात घडली आहे.
सराईताच्या चाकू हल्ल्यात सहायक पोलिस निरीक्षक गणेश रायकर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पोलिसांच्या गोळीबारात करणसिंग राजपुतसिंग दुधानी (वय २९,रा. रामटेकडी) हा सराईत जखमी झाला आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करणसिंग दुधानी हा पुणे शहर व पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत घरफोड्या करणारा गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत सुमारे तीसपेक्षा अधिक गुन्हे दाखल असून, तो वाकड पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यातही फरार होता. बाणेर परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित व्यक्ती फिरताना आढळले होते. दुचाकीच्या क्रमांकावरून तपास केला असता ती दुचाकी आंबेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. तसेच, दुचाकीत जीपीएस यंत्रणा असल्याने तिचे लोकेशन रामटेकडी परिसरात असल्याचे समोर आले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश रायकर यांच्या पथकाने रविवारी सकाळी रामटेकडी परिसरात सापळा रचला. दुचाकीवरून आपल्या साथीदारासह आलेल्या दुधानीला अडवताच शरण येण्याऐवजी त्याने स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार केले आणि रायकर यांच्यावर चाकू हल्ला केला. त्यावेळी स्वसंरक्षणार्थ रायकर यांनी करणसिंगच्या पायावर गोळी झाडली. गोळी लागताच तो जागीच कोसळला, तर त्याचा साथीदार घटनास्थळावरून पसार झाला. फरार साथीदाराचा शोध सुरू आहे.
यापूर्वीदेखील ‘एपीआय’वर कोयत्याने वार
आरोपी राहुलसिंग भोंड, निहालसिंग टाक आणि अमरसिंग टाक (वय २३ रा. पाटील ईस्टेट, शिवाजीनगर पुणे ) हे तिघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. या तिघांनी ऑगस्ट २0२४ मध्ये देखील वानवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयत्याने हल्ला केला होता