

पुणे: रंगांचा सण होळी आणि आलेल्या सलग सुट्यांमुळे पुणे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची शुक्रवारी (दि.27) प्रचंड गर्दी झाली होती. नोकरी आणि शिक्षणासाठी पुण्यात स्थायिक झालेले नागरिक सणासुदीनिमित्त आपल्या मूळ गावी जाण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने पुणे रेल्वेस्थानक परिसर प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पुणे रेल्वेस्थानकावरून रेल्वे प्रशासनाने होळी विशेष जादा 9 गाड्यांच्या तब्बल 108 फेऱ्यांचे नियोजन केले आहे. त्यामुळे या गाड्यांमार्फत बाहेरगावी जाण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची पुणे रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यात विशेषतः उत्तर भारत आणि विदर्भाकडे जाणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, 21 फेबुवारी ते 08 मार्च या कालावधीत विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. पुण्याहून प्रामुख्याने नागपूर, दानापूर, गाजीपूर सिटी, गोरखपूर आणि दिल्ली (निजामुद्दीन) या शहरांसाठी अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्या आहेत. स्थानकावरील गर्दीचे नियोजन करण्यासाठी राज्य शासनाच्या होमगार्डचा अतिरिक्त फौजफाटाही येथे तैनात करण्यात आल्याचे दिसले.
सणासुदीला घरी जाण्याची ओढ असतेच, पण तिकीट मिळणे कठीण झाले होते. रेल्वेने होळी स्पेशल गाड्या सुरू केल्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे. गर्दी खूप आहे, पण घरच्यांसोबत होळी साजरी करता येईल, याचा आनंद मोठा आहे.
बिपीन यादव, प्रवासी
सलग सुट्या आल्यामुळे मी गावी जात आहे. स्थानकावर पाय ठेवायला जागा नाही, इतकी गर्दी झालीय; परंतु रेल्वेने जादा गाड्यांची संख्या अजून वाढवण्याची गरज आहे, जेणेकरून वेटिंग लिस्ट कमी होईल, तसेच प्रवाशांना बसायला पूरक जागा मिळेल.
सुनीता देशमुख, प्रवासी
रेल्वेस्थानकावर होळीसाठी होणारी गर्दी लक्षात घेत, आम्ही होल्डिंग एरिया तयार केला आहे, याशिवाय येथे हेल्प डेस्क, कंट्रोल रूम, सुरक्षेसाठी अतिरिक्त होमगार्ड तैनात केले. तसेच, प्रवाशांनी वेळेआधी स्थानकावर पोहोचावे आणि अधिकृत चौकशी खिडकीचा वापर करावा.
हेमंतकुमार बेहेरा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग