

पुणे: एखाद्या विवाहित दांपत्याला जर मूल होत नसेल तर बहुतेकदा स्त्रीला दोष दिला जातो. खरं तर मूल होण्यासाठी स्त्री व पुरुष दोघेही जबाबदार असतात. पुरुषांमधे वीर्य तपासणी एकमेव चाचणी आहे. ज्याच्या आधारे पुरुषाचा फर्टिलिटी स्टेटस कळू शकतो. बऱ्याच वेळा या चाचणीवर लक्ष दिले जात नाही व स्त्रियांवरच उपचार करण्यास सुरुवात होते. त्यामुळे अनेक खर्चिक उपचार करूनही गर्भधारणा होत नाही.
स्त्रियांच्या वाढत्या वयामध्ये स्त्रीबीजांचा साठा व गुणवत्ता खालावते. त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये देखील शुक्राणूची संख्या व गुणवत्ता खालावल्याचे आढळून आले आहे. ज्या पुरुषांमध्ये शुक्राणू हे वीर्यामधून बाहेर पडत नाहीत. मात्र, आंडकोशमधे शुक्राणूचे उत्पादन होत असते. ज्याला आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह अजूस्पर्मिया म्हणतो.
अशा पुरुषांमध्ये टेस्टिक्युलर स्पर्म एक्सट्रॅक्शन (टीईएसई) तंत्रज्ञानाद्वारे अंडकोषात तयार होणारे शुक्राणू काढले जातात व इंट्रा सायटोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन (आयसीएसआय)द्वारे स्त्रीबीजाशी मिलन घडविले जाते. यापासून तयार झालेले गर्भ स्त्रीच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केला जातो.
एम्बायॉनिक फर्टिलिटी अँड आयव्हीएफ सेंटरचे संचालक व गर्भविषयक तज्ज्ञ डॉ. निखिल गोसावी म्हणाले की, एप्रिल 2025 मध्ये जोडप्यावर उपचार करण्यात आले. यातील पुरुषाच्या टीईएसई नमुन्यांमध्ये फक्त एकच शुक्राणू मिळाला.
या शुक्राणूचा वापर करून स्त्रीबीजाचे फलन करण्यात आले. या गर्भाला प्रगत आयव्हीएफ तंत्रज्ञान वापरून स्त्रीच्या शरीराबाहेर म्हणजेच इन-वीट्रो पद्धतीने पाच दिवस वाढवण्यात आले. त्यानंतर गर्भाशयात गर्भ प्रत्यारोपित करण्यात आला. या दाम्पत्याला 14 फेबुवारी रोजी संतानप्राप्ती झाली.