

पुणे: दारूच्या नशेत टल्ली झालेल्या सहकारनगर पोलिस ठाण्यातील गुन्हे निरीक्षकाने पहाटेच्या वेळी ठाण्यात गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या निरीक्षक महाशयांनी तक्रारदारालाच हाताने आणि बुटाने बेदम मारहाण केली. राजेश खांडवे असे या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी, खांडवेविरुद्ध दारूबंदी महाराष्ट्र अधिनियमानुसार सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत महिला पोलिस अंमलदार मीरा किंद्रे यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार शुक्रवार (दि. ७) मध्यरात्री साडेबारा ते पहाटे पावणेचार वाजताच्या दरम्यान घडला आहे, तर संकेत जाधव यांना खांडवे याने मारहाण केली असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार देखील अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, राजेश खांडवे हे सहकारनगर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक (गुन्हे) म्हणून कार्यरत आहेत. ते पहाटे २ च्या सुमारास पोलिस ठाण्यात आले. त्यावेळी ते दारू नशेत होते. त्यांनी पोलिस ठाण्यात आरडाओरडा करत एकच गोंधळ घातला. पहाटे दोन ते अडीच वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तातडीने सहकारनगर पोलीस ठाणे गाठले.
त्यानंतर राजेश खांडवे यांना आवरण्यात आले. या घटनेने पुणे शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस निरीक्षकानेच पोलिस ठाण्यात दारू पिऊन गोंधळ घातल्याने सर्व पोलिस दलात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, खांडवेविरुद्ध गडचिरोली येथे कार्यरत असताना देखील काही गुन्हे दाखल असल्याचे समजते.
दारू पिल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड
काकांना मारहाण करण्यात आली असल्याची तक्रार सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी संकेत जाधव गेले होते. ते तक्रार देत असतानाच पोलिस निरीक्षक खांडवे हा तेथे आला त्याने जाधव यांना हाताने आणि बुटाने मारहाण केली. त्यावेळी खांडवे दारूच्या नशेत होता. ससून रुग्णालयात खांडवेची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याने मद्यप्राशन केल्याचे समोर आले.
दारूच्या नशेत पोलिस ठाण्यात गोंधळ घालून तक्रारदाराला मारहाण केल्याप्रकरणी, पोलिस निरीक्षकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
मिलिंद मोहिते, पोलिस उपायुक्त