

पुणे: हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणात पोलिसांनी झांबरे यांच्या घरातून ३५ तोळे सोने, चांदीचे दागिने, पती अक्षय व सासरे अरविंद यांचे मोबाईल, तसेच मृत पायलचा मोबाईल व सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. गुन्ह्यातील उर्वरित १५ तोळे सोने अद्याप हस्तगत करायचे असून, सासू मंगल झांबरे यांचा मोबाईलही जप्त करणे बाकी आहे. तसेच, फरार आरोपी अक्षता झांबरेचा शोध घेण्यासह गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकार पक्षाने केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. सकळे यांच्या न्यायालयाने पतीसह सासू-सासऱ्याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली.
या प्रकरणातील, आरोपी पती अक्षय अरविंद झांबरे (वय ३५), सासरा अरविंद वसंतराव झांबरे (वय ६८) आणि सासू मंगल अरविंद झांबरे (वय ५८, सर्व रा. मंगलमय, झांबरे पॅलेसजवळ, मुकुंदनगर) यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे ॲड. भाग्यश्री डागळे-संचेती व फिर्यादी पक्षाच्या वतीने ॲड. पुष्कर पाटील, ॲड. ऋतुराज पाटील आणि ॲड.
आकाश कामठे यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणात विवाहितेच्या मृतदेहाचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याचा व्हिसेरा, दोरी तसेच इतर नमुने रासायनिक विश्लेषणासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींच्या घरातून ३५ तोळे सोने, चांदीचे दागिने आणि तीन मोबाईल जप्त केले आहेत. मात्र, गुन्ह्यातील उर्वरित १५ तोळे सोने अद्याप मिळालेले नाही.
हे सोने फरार आरोपी अक्षता झांबरे ऊर्फ निमनकडे दिले असण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने तपास करणे आवश्यक आहे. तसेच, फिर्यादीनुसार आरोपींनी पायलकडे वेळोवेळी पैशांसह सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली होती. ही मागणी मंगल झांबरे यांच्या मोबाईलवरून करण्यात आल्याने तो मोबाईल जप्त करणे आवश्यक आहे. मात्र, त्याबाबत आरोपीं कडून अद्याप माहिती मिळालेली नाही, असे सरकार पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
अक्षता झांबरेचा पोलिसांना शोध
पायलच्या आई-वडिलांनी दिलेले दागिने आणि पैशांतून आरोपींनी कोणती मालमत्ता खरेदी केली आहे का? याचाही तपास करायचा आहे. जप्त केलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून त्यातील संभाषणे आणि संदेशांची पडताळणी करणे आवश्यक आहे. तसेच, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्ह्याशी संबंधित घटनाक्रम स्पष्ट करायचा आहे. फरार आरोपी अक्षता झांबरेचा शोध घेऊन तिला अटक करणेही बाकी असल्याने आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, असा युक्तिवाद ॲड. पुष्कर पाटील आणि ॲड. ऋतुराज पासलकर यांनी केला.