

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या मोटार परिवहन विभागातील डिझेलचा साठा पूर्णपणे संपल्याने पुढील आदेश मिळेपर्यंत कोणतीही डिझेल वाहने इंधन भरण्यासाठी पाठवू नयेत, असे आदेश सर्व पोलिस ठाणे, शाखा आणि विभागांना देण्यात आले आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, बंदोबस्त आणि आपत्कालीन सेवांसाठी रस्त्यावर धावणाऱ्या पुणे पोलिसांच्या शेकडो वाहनांपुढे इंधनाचे संकट उभे राहिले आहे.
याबाबत मोटार परिवहन विभागाने सर्व पोलिस ठाणे गुन्हे शाखा आणि इतर आस्थापनांना अंतर्गत पत्रव्यवहार केला आहे. यात डिझेल पंपावरील साठा संपल्याचे नमूद करण्यात आले आहे. सध्या केवळ पेट्रोल उपलब्ध असून, पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांनाच इंधन भरण्यासाठी पाठविण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या ताफ्यात डिझेलवर चालणारी जवळपास ३०० वाहने आहेत. यामध्ये पोलिस ठाण्यांच्या गस्ती गाड्या, गुन्हे शाखेची वाहने, वाहतूक शाखेची वाहने, दंगल नियंत्रण पथकाची वाहने, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शासकीय गाड्या, तसेच विविध विशेष मोहिमा आणि बंदोबस्तासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचा समावेश आहे. या वाहनांवर शहरातील पोलिस यंत्रणेचे मोठे कामकाज अवलंबून असते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या तणावपूर्ण घडामोडींमुळे इंधन बाजारावर दबाव वाढल्याची चर्चा असताना केंद्र सरकारकडूनही इंधनाचा काटकसरीने वापर करण्यावर भर दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ऊर्जा बचत आणि आवश्यक तेवढाच इंधनाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या इंधन साठ्याचा प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे. डिझेल साठा नेमका कोणत्या कारणामुळे संपला, नवीन साठा कधी उपलब्ध होणार, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी अंतर्गत संदेशामुळे पोलिस दलातील वाहन व्यवस्थापनावर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या अत्यावश्यक कामांसाठी उपलब्ध इंधनाचा वापर प्राधान्याने करण्याबाबत विभागीय स्तरावर नियोजन सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.