

मोरगाव: अष्टविनायकांपैकी प्रथमपूज्य मानल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र मोरगाव येथे सोमवती अमावास्येनिमित्त सोमवारी (दि. १५) श्री मयूरेश्वराच्या मूर्तीस कर्हा नदीतीरी पारंपरिक ऊर्ध्ववचन अर्थात स्नान घालण्याचा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. आध्यात्मिक आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व असलेल्या या प्राचीन परंपरेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
सध्या भारतीय पुरातत्व विभागाकडून श्री मयूरेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्याने मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी बंद आहे. तरीही मंदिर संस्थानच्या नियोजनानुसार शेकडो वर्षांची परंपरा असलेला पालखी सोहळा यथाविधी पार पाडण्यात येणार आहे. भाविकांना सध्या अकराव्या पायरीजवळून श्रींचे दर्शन घेता येत असून, अधिक मासामुळे हा कालावधी विशेष पुण्यकाळ मानला जात आहे.
सोमवारी सकाळी ८.३० वाजता पर्वकाळात श्री मयूरेश्वराची पालखी मंदिर परिसरातून राजेशाही थाटात कर्हा नदीवरील गणेशकुंडाकडे मार्गस्थ होईल. सनई-चौघड्याचे मंगल स्वर, नगाऱ्यांचा गजर, पारंपरिक लवाजमा, छत्र्या, अब्दागिरी तसेच फटाके आणि तोफांच्या सलामीने पालखी सोहळ्याला वैभवशाली स्वरूप प्राप्त होणार आहे. मंदिर प्रदक्षिणेनंतर पालखी बाजारपेठेतून मार्गक्रमण करीत गणेशकुंडावर पोहचेल.
गणेशकुंडावर मंत्रोच्चारात आणि पारंपरिक विधीनुसार श्रींची मूर्ती गावातील सोनाराकडे सुपूर्त करण्यात येते. त्यानंतर मूर्तीस उटणे लावून ऊर्ध्ववचन अर्थात पवित्र स्नान घालण्याची प्रथा पार पाडली जाते. पुढे ग्रामस्थ परंपरेनुसार श्री मयूरेश्वराची मूर्ती डोक्यावर घेऊन स्नानविधी पूर्ण करतात. हा सोहळा मोरगावच्या धार्मिक परंपरा आणि श्रद्धेचे अनोखे प्रतीक मानला जातो.
सोमवती अमावास्येच्या पुण्यकाळात साजरा होणारा हा सोहळा शेकडो वर्षांपासून अखंडपणे सुरू असून, भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. स्नानविधीनंतर श्रींची मूर्ती पुन्हा पालखीतून राजेशाही थाटात मंदिराकडे आणली जाते. या वेळी
रेवडी, खोबरे, शेंगदाणे आदींची उधळण करण्यात येते. ग्रामपंचायतीमार्फत भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. धार्मिक परंपरा, ग्रामस्थांचा सहभाग आणि श्री मयूरेश्वरावरील अखंड श्रद्धेचे दर्शन घडविणारा हा ऊर्ध्ववचन सोहळा मोरगावच्या आध्यात्मिक वैभवाला अधोरेखित करणारा ठरणार आहे.