

पुणे: शहरात मसाज सेंटर (स्पा) आडून वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालविणाऱ्या दलालाला पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक वर्षासाठी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. धनराज श्यामराव जाधव (वय 44, रा. शिव हाईटस, फ्लॅट नं 602, सेक्टर नं. 13, खारगर, नवी मुंबई) असे त्याचे नाव असून, एमपीडीए कायद्यानुसार त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
धनराज हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार, पुणे शहर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे शहर येथील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. धनराज हा पुणे शहरात मसाज सेंटरच्या आडून तरुणींना आर्थिक प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता. गुन्हे दाखल झाल्यानंतरदेखील त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई करणे गजेचे होते. 14 जानेवारी 2025 मध्ये धनराज याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. मात्र, तेव्हापासून तो फरार झाला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात मसाज सेंटरच्या आडून देहविक्रीची दुकाने चालविणाऱ्या दलालांपैकी धनराज हा एक प्रमुख दलाल आहे. पुणे शहरात त्याचे मोठ्या प्रमाणात मसाज सेंटर (स्पा) आहेत. तसेच तो एकट्या पुण्यात हा व्यवसाय न करता संभाजीनगर, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, मुंबई अशा विविध ठिकाणच्या शहरात सूत्रबद्ध पद्धतीने देहविक्रीचे रॅकेट चालवित होता. एवढेच नाही तर त्याचे बाहेरच्या राज्यात देखील मसाज सेंटर असून, तेथे देखील तो हे रॅकेट चालवितो. त्याच्या स्पा सेंटरवर अनेकदा पोलिसांनी कारवाई केली होती. मात्र, तो काही केल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता. शहराच्या बाहेरून तो हे रॅकेट चालवित असे.
2024 मध्ये धनराजवर वानवडी पोलिस ठाण्यात त्याच्या स्पा सेंटरमध्ये चालवित असलेल्या वेश्याव्यवसाय प्रकरणी, वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या गुन्हेगारी कृत्याची दखल घेत तत्कालीन वानवडी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी स्थानबद्धतेचा प्रस्तावर पोलिस उपायुक्तांच्या मार्फत सादर केला होता. त्यानुसार जानेवारी 2025 मध्ये धनराजवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. परंतु आपल्यावर कारवाई झाल्याची चाहूल लागताच तो पुण्यातून फरार झाला होता. दरम्यान, पोलिस त्याच्या मागावर होते. शनिवारी (दि.7) धनराज वानवडी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची रवानगी नागपूर कारागृहात एक वर्षासाठी करण्यात आली आहे.
‘ते’ पोलिस आयुक्तांच्या रडारवर
धनराजप्रमाणेच मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणारे आणखी काही दलाल पोलिस आयुक्तांच्या रडावर आहेत. त्यांची सर्व कुंडली आयुक्तांनी एकत्र केली असून, लवकरच काही दिवसांत त्यांच्यावर देखील कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. धनराज याच्यावर करण्यात आलेली कारवाई या दलालांसाठी मोठा इशारा असल्याचे बोलले जाते आहे, तर दुसरीकडे स्पाच्या रॅकेटमध्ये पोलिस ठाणे स्तरावर काम करणारे ‘झीरो’सुद्धा आयुक्तांच्या टार्गेटवर असल्याची माहिती आहे.
स्पा माफियांना इशारा
स्पा, मसाज सेंटरच्या आडून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाच्या बाबातीत सुरुवातीपासूनच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक भूमिका घेतली आहे. याबातचे कोणतेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, तशा सूचना त्यांनी स्थानिक पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या असून, वेळोवेळी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे अनेक स्पामाफियांनी शहरातून काढता पाय घेतला आहे. अशातच आता थेट धनराज याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
मसाज सेंटरच्या आडून सुरू असलेल्या गैरप्रकाराबाबत आमची सुरुवातीपासूनच स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे अशा दलालांवर स्थानबद्धतेची कारवाई करून त्याची रवानगी थेट कारागृहात केली आहे.
अमितेश कुमार, पोलिस आयुक्त पुणे शहर