

पुणे : पुण्यात रात्रीच्या वेळी कामानिमित्त प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचा आणि बाहेरून पुण्यात रेल्वे, एसटीने आलेल्या प्रवाशांचा प्रवास आता सुरक्षित होणार आहे. कारण, पीएमपी प्रशासनाकडून रातराणीची सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या रातराणी बस शहरातील सहा प्रमुख मार्गांवर धावणार असून, याद्वारे पुणेकर प्रवाशांना या बसद्वारे रात्रीही सुरक्षित प्रवास करता येणार आहे.(Latest Pune News)
रात्री उशिरापर्यंत प्रवास करणाऱ्या नागरिक, कामगार आणि रात्रीचे शिफ्ट्स असणाऱ्यांसाठी पीएमपीची ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. रात्रीच्या वेळी खासगी वाहने किंवा टॅक्सींवर अवलंबून राहण्याची प्रवाशांची गरज आता संपली आहे. लवकरच या बससेवेचे उद्घाटन पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
रातराणी बस सेवेमुळे पुणे शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर रात्री उशिरा आणि पहाटेच्या वेळेतही सुरक्षित, वेळेवर आणि परवडणारा सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होत आहे. तसेच, ही सेवा रात्री 11 वाजल्यापासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत प्रवासासाठी उपलब्ध असणार आहे. तिकिटाचे दर नियमित दरांपेक्षा काही प्रमाणात अधिक असतील, असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पुणे शहरात रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या कामगार, आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची वाढती गरज लक्षात घेऊन आम्ही रातराणी सेवा पुन्हा सुरू करत आहोत. रात्रीचा सुरक्षित आणि स्वस्त प्रवास हा पुणेकरांचा हक्क आहे. ही सेवा सुरू झाल्याने रात्रीच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. लवकरच या सेवेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पुणेकरांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल