

पुणे: महापालिका प्रशासनाच्या कारभारातील गंभीर बेपर्वाईचा धक्कादायक नमुना बुधवारी (दि. २९) महासभेत उघडकीस आला. महंमदवाडी येथील महापालिकेच्या प्राथमिक शाळेची जागा खासगी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलला भाडेतत्त्वावर देण्यासंबंधीच्या प्रस्तावाची मूळ फाईलच गायब झाल्याचे स्पष्ट होताच सभागृहात संतापाचा भडका उडाला. सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत या प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली.
महंमदवाडीतील संबंधित जागा भाड्याने देण्याबाबत प्रशासनाकडे विविध स्तरांवर पत्रव्यवहार झाला होता. भाडे निर्धारण समितीचे निर्णय, शिक्षण विभागाच्या नोंदी आणि प्रस्तावाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे या फाईलमध्ये होती. ७ जुलै रोजी झालेल्या भाडे निर्धारण समितीच्या बैठकीत प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर हा प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी महासभेसमोर येणे अपेक्षित होते. मात्र, महासभेत पोहोचण्यापूर्वीच संपूर्ण फाईल बेपत्ता झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणावर खुलासा करताना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या उपायुक्त वसुंधरा बारवे यांनी फाईल गहाळ झाल्याची कबुली दिली. त्या म्हणाल्या, “७ जुलै रोजी भाडे निर्धारण समितीची बैठक झाल्यानंतर ही फाईल माझ्याकडे आली होती. आमच्या कार्यालयातून कोणत्याही टेबलवर न जाता ती गहाळ झाली.”
या खुलाशानंतर सभागृहातील वातावरण अधिकच तापले. महापालिकेच्या मालमत्तेशी संबंधित एवढी महत्त्वाची फाईल गायब होणे ही केवळ साधी चूक नसून, गंभीर प्रशासकीय हलगर्जी असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. संबंधित फाईल कोणाच्या ताब्यात होती आणि ती नेमकी कशी गायब झाली, याची तातडीने चौकशी करून दोषींना निलंबित करण्याची मागणी सभागृहातून करण्यात आली.
चौकशी अहवालानंतर कारवाई करू: मंजूषा नागपुरे
महापौर मंजूषा नागपुरे यांनी मात्र चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नियमानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले. आता या चौकशीतून फाईलच्या गुढाचा उलगडा होणार की प्रकरण पुन्हा दप्तरातच दडपले जाणार, याकडे लक्ष लागले आहे.