

वेल्हे: जागतिक वारसास्थळ व छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या जगातील पहिल्या लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्राची पहिली राजधानी किल्ले राजगडाच्या पाल खुर्द व गुंजवणे हे दोन्ही पायी मार्ग धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे धोकादायक झाले आहेत. गडावर ये-जा करण्यासाठी सुरक्षित पायी मार्ग नसल्याने हजारों पर्यटकांचे जीव टांगणीला लागले आहेत.
शासनाने गडाच्या पायरी, पायी मार्गाच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे; मात्र हा कागदावरच असल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. शासनाकडून भरीव निधी उपलब्ध होऊनही निकृष्ट दर्जाची, संथगतीने सुरू असलेली कामे, भौगोलिक परिस्थितीशी सामना करण्यास अनुकूल नसलेले कारागीर, मजूर, वर्षानुवर्षे ठराविक ठेकेदार आदींमुळे राजगडचा विकास मंदावला असल्याची तक्रार संतप्त शिवभक्तांनी केली आहे.
युनोस्कोच्या आंतरराष्ट्रीय समितीने राजगडाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला, तेव्हापासून गडावर देशी-विदेशी पर्यटक, अभ्यासकांची वर्दळ वाढली आहे. गडावर वाहने जाण्यासाठी थेट रस्ता नाही, तसेच रोप-वे नाही. त्यामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगातील अति दुर्गम राजगड किल्ल्यावर जाण्यासाठी पायी मार्गाशिवाय दुसरा मार्ग नाही. अलिकडच्या वर्षभरात राजगडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या दोन ते चार पटीने वाढली आहे. शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी राजगडावर १० ते १२ हजारांवर पर्यटक येत आहेत.
शिवकालीन पाल खुर्द पायी व पायरी मार्गाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. खंडोबा माळ ते पाल खुर्द दरवाजा हा दीड किलो अंतराचा पायी मार्ग मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी जमीनदोस्त झाला आहे. पावसाच्या धो-धो वाहणाऱ्या पाण्यामुळे पायी मार्गाला अनेक ठिकाणी ओढ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. माती वाहून गेल्याने खोल नाळा पडल्या आहेत. चिखल-पाण्यातून चढ-उतार करताना पर्यटक घसरून कोसळत आहेत.
उंच डोंगर, जंगलातून हा मार्ग आहे. मार्ग चुकून अनेकदा पर्यटक खोल कड्यात अडकून पडत आहेत. पायरी मार्गाचीही दुर्दशा झाली आहे. मागील २० वर्षांपूर्वी पाल दरवाजा पायरी मार्गावरील बुरुज, संरक्षक भिंत वाहून गेली, तेव्हापासून हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. पावसाचे पाणी झिरपून अनेक पायऱ्या उन्मळून पडल्या आहेत. गुंजवणी मार्गही अनेक ठिकाणी निसरडा झाला आहे.
पाल खुर्द पायरी मार्गाची डागडुजी करण्यात येणार आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. मुख्य पाल खुर्द महादरवाजा, पायरी मार्गावर पावसाचे पाणी साठू नये, यासाठी वेळोवेळी सफाई करून पाणी बाहेर काढले जात आहे. सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक तसेच पाहरेकरी तैनात करण्यात आले आहेत.
डॉ. विलास वाहणे, सहसंचालक, पुरातत्व पुणे विभाग
राजगडच्या दोन्ही बाजूचे पायी मार्ग वन विभागाच्या जागेतून जात आहेत. बुरुजापासून पुरातत्व खात्याची हद्द आहे. पाल खुर्द व गुंजवणे पायी मार्गाची डागडुजी दुरुस्ती करण्यासाठी तसेच पर्यटकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाने साडे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे; मात्र प्रत्यक्षात काम करण्यासाठी आवश्यक मंजुरी मिळाली नाही. पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुळ शिवकालीन धर्तीवर पायी मार्गाचा विकास केला जाणार आहे. याबाबत लवकरच वरिष्ठ पातळीवर बैठक होणार आहे. पावसामुळे पायी मार्ग निसरडे झाले असल्याने पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी आवश्यक दुरुस्ती करून खबरदारी घेतली जात आहे.
अनिल लांडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी, राजगड तालुका