

खडकवासला पुढारी वृत्तसेवा : पुणे-पानशेत रस्त्यावरील खानापूर, मणेरवाडी येथील पुलाचे काम चार वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. पावसामुळे या पुलासह जुन्या पुलावर पाणी व चिखल साठून राडारोडा तयार झाला आहे. त्यामुळे पर्यटक, नागरिक व विद्यार्थ्यांना हलाखीला तोंड द्यावे लागत आहे. पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम करण्यात येणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले होते. मात्र, पावसाळा सुरू होऊनही पुलाचे काम 'जैसे थे' आहे. हायब्रिड अॅम्युनिटी प्रकल्पांतर्गत पुलाचे काम सुरू करण्यात आले होते.
दिरंगाईबद्दल ठेकेदारावर कारवाई झाल्याने काम अर्धवट अवस्थेत राहिले आहे, असे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. आमदार भीमराव तापकीर यांनी पुलाचे रखडलेले काम पूर्ण करण्याच्या सूचना देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार म्हणाले की,
पुलाच्या कामाबाबत माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येणार आहे.
पुलाचे जवळपास ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे. ओढ्यावर काँक्रीटचा स्लॅब टाकण्यात आला आहे. मात्र, दोन्ही बाजूंना डांबरीकरण करण्यात आले नाही. कच्च्या रस्त्याची खडी निघून खड्डे पडले आहेत. पुणे तसेच पानशेत, वेल्हे पाबेकडे जाणारी वाहने पुलावरून एकाच वेळी तिन्ही बाजूंना जात असल्याने वाहनचालकांना पाण्याची डबकी व राडारोडा पार करताना कसरत करावी लागत आहे.
वाहतूक वाढल्याने वाहनांची वर्दळ रात्रंदिवस सुरू आहे. रात्री अंधारात पुलावरून चाचपडत ये-जा करावी लागते. पुलावरून वाहने घसरून ओढ्यात कोसळण्याचा धोका आहे. सुरक्षिततेसाठी बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात.
– किसनराव जोरी, माजी उपसभापती, हवेली तालुका पंचायत समिती
हेही वाचा