

परळी; पुढारी वृत्तसेवा : देशातील सर्वांत उंच असलेला भांबवली धबधबा फेसाळू लागला आहे. हा धबधबा तीन टप्प्यात पडत असून, पर्यटकांची या धबधब्याकडे पावले वळू लागली आहेत. घनदाट जंगल व धुक्याच्या दुलईतून पर्यटक वाट काढत पांढरा शुभ्र फेसाळणार्या भांबवली धबधब्याला पाहण्याचा आनंद लूटत आहेत. गेल्या काही वर्षांपासून भांबवली धबधबा हा पर्यटकांना आकर्षित करत आहे.
विशेष म्हणजे हा धबधबा काही वर्षांपूर्वी जास्त चर्चेत नव्हता, कारण या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी सुरक्षित मार्ग नव्हता. अलीकडे वन विभाग आणि स्थानिक भांबवली वन समिती यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी हा धबधबा पाहण्यासाठी जांभ्या दगडाचा पायरी मार्ग तसेच धबधबा पाहण्यासाठी सुरक्षित जागा केल्यामुळे हा धबधबा पावसाळी पर्यटनासाठी एक महत्त्वाचे ठिकाण ठरले आहे. या ठिकाणची घनदाट, झाडी पक्ष्यांचा किलबिलाट, वन्यप्राण्यांचा वावर यासह येथील अल्लाददायक वातावरण म्हणजेच सतत पाऊस आणि दाट धुके त्यामुळे या परिसरात जायचे म्हणजे पावसात भिजण्याची मनोमन तयारी असायलाच हवी. सातारा शहरातून कास पठार व तिथून पुढे गेल्यावर कास तलावच्या पुढे तांबी हे गाव लागते. तांबी गावातून खाली दोन किलोमीटर अंतरावर भांबवली हे गाव आहे. या ठिकाणी वाहन तळावर वाहने लावून पर्यटकांना पायी भांबवली धबधब्या पर्यंत पोहोचता येते.