

पुणे: पाणी टँकरच्या बोगस फेऱ्या, पाण्याची चोरी आणि नागरिकांची संभाव्य आर्थिक लूट रोखण्यासाठी पुणे महापालिकेने जाहीर केलेली ओटीपी आधारित टँकर व्यवस्थापन प्रणाली अद्याप प्रत्यक्षात सुरूच झालेली नाही. सहा महिन्यांपूर्वी गाजावाजा करून घोषित केलेल्या या यंत्रणेसाठी आता आचारसंहिता संपल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात टँकरवर अवलंबून असलेल्या नागरिकांना पारदर्शक सेवा मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे. घोषणा आणि अंमलबजावणी यांतील अंतरामुळे महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शहरातील टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा पारदर्शक व्हावा, प्रत्यक्ष पाणी न पोहोचवता फेऱ्यांची नोंद होऊ नये आणि गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी ही प्रणाली प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, सूस आणि म्हाळुंगे परिसर वगळता शहरातील बहुतांश भागांत ही यंत्रणा सुरू नसल्याचा दावा सजग नागरिक मंचाने केला आहे. मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी या विलंबाकडे लक्ष वेधत, प्रणालीची घोषणा करून सहा महिने उलटले तरी अंमलबजावणी का झाली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.
प्रस्तावित यंत्रणेनुसार, नागरिकांना अॅपच्या माध्यमातून टँकर बुक करता येणार आहे. टँकर भरणा केंद्रातून निघाल्यापासून तो मागणी केलेल्या ठिकाणी पोहोचेपर्यंतच्या प्रवासाची नोंद ठेवली जाणार आहे. पाणी मिळाल्यानंतर मोबाईलवर आलेल्या ओटीपीद्वारे वितरणाची खातरजमा होईल. त्यामुळे प्रत्यक्षात पाणी न देता बोगस फेऱ्या दाखवणे आणि टँकरच्या पाण्याचा अपहार करणे यांसारख्या प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, आगामी काळात पाणीकपात झाल्यास टँकरची मागणी वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत वितरणावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कार्यान्वित नसल्यास नागरिकांना जादा पैसे मोजावे लागण्याची भीती आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात ही प्रणाली तातडीने सुरू करण्याची मागणी वेलणकर यांनी केली आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी ही प्रणाली अद्याप लागू झाली नसल्याचे मान्य केले. आचारसंहिता संपल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून प्रणाली तातडीने सुरू केली जाईल, असे त्यांनी सांगितले. ओला आणि उबरप्रमाणे काम करणाऱ्या या यंत्रणेमुळे टँकरचे बुकिंग, वितरण आणि पाणी मिळाल्याची नोंद डिजिटल पद्धतीने ठेवता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
...अशी काम करणार ओटीपी प्रणाली
नागरिकांना ॲपद्वारे पाण्याचा टँकर बुक करता येणार.
टँकर भरणा केंद्रातून निघाल्यापासून इच्छित ठिकाणी पोहोचेपर्यंतची नोंद ठेवली जाणार.
पाणी पोहोचल्यानंतर मोबाईलवर आलेल्या ओटीपीद्वारे वितरणाची खातरजमा होणार.
प्रत्यक्ष पाणी न देता बोगस फेऱ्या दाखवण्यास आळा बसण्याची अपेक्षा.
टँकरच्या वितरणावर डिजिटल देखरेख ठेवून गैरप्रकार रोखण्याचा प्रयत्न.
ओटीपी आधारित टँकर व्यवस्थापन प्रणाली अद्याप लागू झालेली नाही. आचारसंहिता संपल्यानंतर यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. ओला आणि उबरच्या धर्तीवर ही प्रणाली काम करेल. नागरिकांना टँकर बुक करता येईल, तसेच टँकर भरणा केंद्रापासून तो अपेक्षित ठिकाणी पोहोचेपर्यंतच्या हालचालींची नोंद ठेवली जाईल. मोबाईलवर आलेल्या ओटीपीद्वारे पाणी मिळाल्याची खातरजमा होईल. त्यामुळे टँकरच्या पाण्याची चोरी आणि बोगस नोंदी रोखण्यास मदत होईल.
नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका