Pune News : बेशिस्त एसटीचालकांना लगाम कधी ? नियमांची रोज पायमल्ली

Pune News : बेशिस्त एसटीचालकांना लगाम कधी ? नियमांची रोज पायमल्ली
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रस्त्यावर लेन शिस्त नाही, गाडी वेगाने चालवणे, सिग्नलचे पालन न करणे, स्थानकातून सर्रासपणे गाड्या बाहेर काढून परिसरात वाहतूक कोंडी करणे, यांसारखा एसटीचालकांचा बेशिस्तपणा दिवसेंदिवस वाढत असून, इतर वाहनचालकांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे एसटी प्रशासन आपल्या चालकांच्या या बेशिस्तपणाला लगाम कधी घालणार?
असा सवाल वाहनचालकांकडून केला जात आहे.

कात्रज घाटात वेगावर नियंत्रण हवे

कात्रज घाट चढताना आणि उतरताना एसटी चालकांमध्येच अनेकदा स्पर्धा लागल्याचे दिसते. पुढे जाण्यासाठी हे एसटी चालक प्रमाणापेक्षा अधिक वेगाने जात धोकादायक पध्दतीने ओव्हरटेक करत असल्याचे समोर आले आहे. तेथेही एसटीच्या गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.

मध्यवस्तीतून येणार्‍या गाड्या बंद करा

मध्यवस्तीतून जाणारे रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यातच पीएमपीच्या मोठ्या बस धावत असतात. बाजारपेठा असल्याने इतर वाहनांची वर्दळदेखील मोठ्या प्रमाणावर असते. त्यातच मध्यवस्तीतील बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्यावर एसटीच्या गाड्यांची भर पडते. त्यामुळे येथील कोंडीत आणखीनच भर पडत आहे. एसटी प्रशासन, वाहतूक पोलिस, आरटीओ यांनी मध्यवस्तीतील कोंडी सोडविण्यासाठी मध्यवस्तीतील रस्त्यांवर येणार्‍या एसटीच्या गाड्यांना बंदी करावी, असे पुणेकर नागरिक बाप्पू भावे दै. 'पुढारी'शी बोलताना म्हणाले.

वाकडेवाडी, स्वारगेट स्थानकाबाहेर करतात वाहतूक कोंडी

पुण्यातील महत्त्वाची एसटी स्थानके असलेल्या वाकडेवाडी (शिवाजीनगर) आणि स्वारगेट स्थानकांच्या बाहेर एसटी चालकांकडून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. स्थानकात जाताना आणि येताना चालक बेशिस्तपणे गाड्या काढतात. त्यामुळे स्थानक परिसरात मोठी कोंडी होत असून, वाहनचालकांना मनस्ताप होत आहे.

विभाग नियंत्रकांशी संपर्क होऊ शकला नाही

पुण्यातील आणि पुण्याबाहेरून शहरात एसटी बस आणणार्‍या बेशिस्त एसटी चालकांमुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. अनेकदा अपघातदेखील होत आहेत. चालकांना शिस्त लावण्यासाठी एसटी प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जातात, याची माहिती घेण्यासाठी दै.'पुढारी'च्या प्रतिनिधीने एसटीच्या पुणे विभागाचे विभाग नियंत्रक कैलास गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

बीआरटी मार्गात सुसाट…

सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गातून स्वारगेटच्या दिशेने येत असताना एसटी चालक अतिवेगाने गाडी चालवतात. या वेगामध्ये ते या रस्त्यावरील अनेक सिग्नलचे पालन न करता ऐशी-तैशी करत असल्याचे समोर आले आहे. त्यासोबतच शंकरमहाराज उड्डाणपुलावरून पद्मावती चौकात येताना उतारावरूनसुध्दा या एसटीच्या गाड्यांचा वेग खूपच असतो. या रस्त्यावर एसटीच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. मागे एकदा उड्डाणपुलावरून वेगाने येताना पद्मावती चौकातच एसटी चालकाने एका दुचाकीस्वाराला चिरडले होते.

शंकरशेठ रस्त्यावर सिग्नलची ऐशी-तैशी

एसटीच्या पुण्यातील मुख्यालयाकडून स्वारगेटच्या दिशेने येणार्‍या चौकातच (घोरपडे पेठेकडे जाणारा रस्त्याजवळ) एसटी चालकांकडून सर्रासपणे सिग्नलची ऐशी-तैशी केली जात आहे. याठिकाणी एसटी चालकांकडून सिग्नलचे पालन होत नसून, एसटीचालक येथे अवैधरीत्या सिग्नलला फाटा देत युटर्न घेतात. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच, या गाड्यांमुळे या परिसरात सातत्याने कोंडी होत आहे.

वाहतुकीच्या नियमांचे पालन व्यवस्थितरीत्या होणे गरजेचे आहे. त्यासाठी आमच्याकडील आणि बाहेरून येणार्‍या सर्व चालकांना याबाबत कडक सूचना करण्यात येतील. वाहतूक नियमांचे पालन न करणार्‍या चालकांना कडक कारवाई करण्यात येईल.

– ज्ञानेश्वर रणावरे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, शिवाजीनगर स्थानक

मला कामानिमित्त माझ्या दुचाकीवर शहरात फिरावे लागते. मात्र, अनेक ठिकाणी कोंडीच पाहायला मिळते. खासकरून ही कोंडी एसटी आणि पीएमपीच्याच मोठ्या गाड्यांमुळे झाल्याचे दिसते. त्यामुळे प्रशासनाने या दोन्ही गाड्यांच्या चालकांना शिस्त लावावी.

– राकेश जाधव, वाहनचालक

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news